जाहिरात

Pune News: रात्री 9.21ची वेळ...धूर, आग अन् प्रवाशांमध्ये घबराट, पुणे-बारामती रेल्वे मार्गावर नेमकं काय घडलं?

Pune News: पुणे-बारामती DEMU ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पाटस रेल्वे स्थानकाजवळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. नेमके काय घडले होते, वाचा सविस्तर बातमी.

Pune News: रात्री 9.21ची वेळ...धूर, आग अन् प्रवाशांमध्ये घबराट, पुणे-बारामती रेल्वे मार्गावर नेमकं काय घडलं?
"Pune News: पुणे-बारामती रेल्वे प्रवासात रात्री अचानक काय घडले?"
NDTV Marathi

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune News: पुण्याहून बारामतीकडे जाणाऱ्या डेमू (DEMU) रेल्वेगाडीत सोमवारी (11 मे) रात्री अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पाटस रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनचा ब्रेक जाम झाल्यामुळे डब्यातून धूर निघू लागला तसेच किरकोळ आगही दिसून आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

धूर, आग, प्रवाशांमध्ये घबराट; पुण्यात नेमके काय घडले?

पुण्याहून सोमवारी संध्याकाळी 6.45 वाजता सुटलेली पुणे-बारामती डेमू ट्रेन (क्रमांक 71411) नेहमीप्रमाणे बारामतीकडे जात होती. रात्री 9:21 वाजण्याच्या सुमारास पाटस रेल्वे स्टेशनजवळ पोहोचली असता गाडीच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ब्रेक अचानक जाम झाल्यामुळे चाकांजवळ मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन डब्याखालून धूर निघू लागला. धुराचे लोट पाहून प्रवाशांना गाडीत आग लागल्याचा संशय आला आणि त्यांच्यात भीती पसरली.

रेल्वे प्रशासनाची तत्परता

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रेल्वे जनसंपर्क अधिकारी हेमंत बेहरा यांनी यासंदर्भात माहिती दिली की, "ब्रेक जाम झाल्याने धूर निघत होता. तांत्रिक बिघाड अवघ्या 9 मिनिटांत दूर करण्यात आला. पण पुढील रेल्वे मार्ग मोकळा नसल्याने आणि दुसरी गाडी धावत असल्याने डेमू ट्रेनला जवळपास अर्धा तास पाटस स्टेशनवर थांबावे लागले."

(नक्की वाचा : Pune News : पुणे-सुपौल धावत्या एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना, पुढे असं काही घडलं..)

प्रवाशांची नाराजी आणि तक्रार

रेल्वे प्रशासनाने बिघाड दुरुस्त केल्याचा दावा केला असला तरी, गाडी जवळपास एक तास पाटस परिसरात उभी असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गाडी नेमकी कधी सुटणार? याबाबत स्टेशनवर कोणतीही अधिकृत किंवा स्पष्ट माहिती दिली जात नव्हती, अशी तक्रार प्रवाशांनी केली. अखेर रात्री 9.57 वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर करण्यात आल्यानंतर गाडी बारामतीकडे रवाना झाली.

महत्त्वाची बाब 

या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा प्रवासाचा खोळंबा झाला असला, तरी रेल्वेने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com