Chhagan Bhujbal Helicopter Landing: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगच्या जागेत लँडिंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आज सुदैवाने मोठा अपघात टळला, पण शासनाने एवढा हलगर्जीपणा करणे योग्य नाही," अशा शब्दांत रोहित पवारांनी गंभीर मुद्दा मांडला आहे.
रोहित पवार यांनी व्यक्त केली भीती
राशप आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "मा. छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा!"