- देवा राखुंडे, प्रतिनिधी
Sunetra Pawar News: बारामतीच्या राजकारणात बसपाचे नेते काळुराम चौधरी आणि अजित पवार यांची जोडी कायमच चर्चेचा विषय राहिली. कारण विकासाच्या मुद्यावर काळुराम चौधरी यांनी अनेक वेळा अजित पवार यांना धारेवर धरलं होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा घाईघाईत करण्यात आला, अशी चर्चा सुरू असतानाच बहुजन समाज पार्टी प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी गंभीर विधान केले आहे. जर हा शपथविधी झाला नसता तर सुनेत्रा पवार यांच्यासह दोन्ही मुलांना वाळीत टाकलं असतं, असा गंभीर आरोप काळुराम चौधरी यांनी केलाय.
(नक्की वाचा: Parth Pawar News: अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी भाजपाचा विरोध? पुण्यातील ही गोष्ट भोवली?)
...तर दादांसोबत संघर्ष झाला नसता: काळुराम चौधरी
काळुराम चौधरी म्हणाले की, "राजकीय आणि वैचारिक मुद्यावर माझा अजित पवारांना विरोध होता. ज्यावेळी अजितदादा विधानसभेत स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असे म्हणाले होते, त्यावेळेस मी मोर्चा काढून त्यांचे समर्थन केले होते. अजितदादांबरोबर जी मलिदा गँग आहे, ती मलिदा गँग चुकीची कामं करायची, मग मला मुद्दा मिळायचा. त्यांनी चुकीचं केलं नसतं तर माझा आणि दादांचा संघर्ष झाला नसता".
काळुराम चौधरी यांचं स्फोटक विधान
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत काळुराम चौधरी म्हणाले की, "तत्काळ शपथ घेण्याची गरज होती. अन्यथा मायलेकरांना वाळीत टाकलं असतं. त्यांच्या घरातील लोक कुठे चांगली होती. सावडलं तुम्ही सोनगावला आणि एक तासानंतर साहेब (शरद पवार) नीरा नदीवर कशाला गेले? तुम्ही इथलेच आहे की, तुम्हीच म्हणता ना माझी बारामती आहे. नीरेचे प्रदूषण पवारांसाहेबांना आता समजलं का? तिकडून राजकारण, तशा हालचाली सुरू झाल्या होत्या. हे झालं म्हणून शपथविधी झाला. बाळकडू घरातच मिळालेल्या वहिनींनी बरोबर वेळेत जाऊन जे केले ते चांगले केले, अन्यथा वहिनी (सुनेत्रा पवार) आणि दोन मुलांना (पार्थ पवार आणि जय पवार) वेगळं पाडलं असतं. शब्दाचा पक्का होता तो माणूस राहिला नाही, पवारसाहेब शब्दाचे पक्के नाहीत. त्यांच्या बोलण्यात काहीतरी राजकारण असतं" अशी थेट भूमिका मांडत काळुराम चौधरी यांनी राशपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गंभीर आरोप केले आहेत.