सूरज कसबे
पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. पुणे शहरात वाहतूकीचे नियम आहेत की नाहीत असा प्रश्न तिथली परिस्थिती पाहिल्या नंतर पडतो. पुण्या प्रमाणेच त्याच्या अजूबाजूला विकसीत होत असलेल्या शहरात ही पुण्याचेच गुण लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. पुण्याजवळच तळेगाव दाभाडे हे शहर विकसीत होत आहे. इथली रहदारी ही आरोआप वाढली आहे. रहदारी वाढली पण वाहतूक मात्र पुर्णपणे कोलमडल्याचं चित्र आहे. त्याला जबाबदार हे बेशिस्तपणे वाहन चालवणारे आणि वाहतूकीचे नियम तोडणारे आहेत. त्यांना सरळ करण्याचा सपाटा सध्या पोलीसांनी लावला आहे.
तळेगाव दाभाडे शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धडक मोहीम राबवली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही वाहनचालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई प्रामुख्याने फॅन्सी नंबरप्लेट, विना नंबरप्लेट तसेच काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर करण्यात आली आहे. फॅन्सी नंबरप्लेट काय किंवा काळी फिल्म लावणे काय हे एक फॅड झाले आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आळा बसावा आणि शहरात शिस्त निर्माण व्हावी, या हेतूने ही मोहीम राबवण्यात आल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक विभागाने केलेल्या या कारवाईचे सजग नागरिकांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अशा मोहिमांमध्ये सातत्य ठेवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. याचबरोबर, शहरात फटाके फोडणारे आणि आवाज प्रदूषण करणारे 'बुलेटराजा' यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ध्वनिप्रदूषणासारख्या समस्यांवरही वाहतूक विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच, तळेगाव दाभाडे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भविष्यातही अशा मोहिमा सुरू ठेवून शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची आशा नागरिकांना आहे. त्यानंतर तरी हे स्टंटबाज आणि वाहतूक नियम तोडणारे वीर सुधारतील का याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण मोहीम राबली जाते पण काही दिवसांनी जैसे थे अशीच परिस्थिती निर्माण होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world