Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील गॅस टँकर अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवेवर 33 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि हजारो वाहनचालक, प्रवासी अडकून पडले होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी रतन सिंह उदय नारायण सिंह (वय 44 वर्षे) याच्याविरुद्ध निष्काळजीपणा, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि इतरांचे आयुष्य / वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नेमके काय घडलं होतं?
3 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटला होता. एक्स्प्रेसवेवर ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. हा टँकर कोचीनहून गुजरातच्या दिशेने जात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त होता आणि उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले.
(नक्की वाचा: Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर मृत्यूचं तांडव टळलं? 36 तास चाललेल्या ऑपरेशनचं भयावह सत्य)
33 तासांनंतर वाहतूक झाली होती पूर्ववत
या अपघातामध्ये टँकर चालक आणि क्लिनर जखमी झाले होते. या दोघांवर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अपघाताप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एक्स्प्रेसवेवरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक अपघातानंतर तब्बल 33 तासांनी म्हणजेच 5 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास पूर्ववत झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world