पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील पेट्रोल पंपांवर रात्रीनंतर सेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील पेट्रोल डिलर्स असोसिएशनने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल, डिझेल पंपावरून इंधनाचे वितरण बंद करावे लागेल. पेट्रोलपंप चालकांनी पोलीस प्रशासनाला हे निवेदन सादर केले असून पोलीस आता याबद्दल काय भूमिका घेतायत याकडे त्यांचे लक्ष आहे.
नक्की वाचा: CNG पुरवठा सुरळित कधी होणार ? MGLने दिली महत्त्वाची माहिती
पुण्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण
येरवडा परिसरात इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक घटना घडली होती. एका कर्मचाऱ्याला पेट्रोल पंपावर मारहाण करण्यात आली होती. भैरोबा नाला परिसरातील एका पेट्रोलपंपावरही असाच प्रकार घडला होता. या घटनेमुळे पेट्रोलपंप चालक चिंतेत पडले असून या घटनांमुळे कर्मचारी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घटनातील आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ही मागणी करणारे निवेदन पेट्रोल पंप चालकांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना आणि पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
नक्की वाचा: इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; विधवा महिलांबद्दल म्हणाले...
पेट्रोल पंपावर भांडणे, कर्मचारी चिंतेत
पेट्रोल पंप चालकांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावते आहे. रात्री अपरात्री पेट्रोल पंपावर होणारी भांडणे वाढू लागली असून यातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. याबद्दल ठोस उपाययोजना केली नाही तर पुणे शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्री संध्याकाळी 7 नंतर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.