जाहिरात

Mumbai CNG Issue: CNG पुरवठा सुरळित कधी होणार ? MGLने दिली महत्त्वाची माहिती

Mumbai CNG Issue: 'महानगर गॅस' ही मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी पुरवठा करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.

Mumbai CNG Issue: CNG पुरवठा सुरळित कधी होणार ? MGLने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई:

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठीही महत्त्वाचा भाग बनलेल्या CNG चा पुरवठा विस्कळीत झालाय. यामुळे सोमवारी मुंबईची वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली होती. सोमवार रात्रीपर्यंत हे संकट अधिकच गडद बनले होते. मंगळवारीही याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे.

 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) च्या आवारात गेलेल्या 'गेल' (GAIL) च्या मुख्य गॅस पुरवठा पाईपलाईनचे 'थर्ड-पार्टी'मुळे झालेले नुकसान या संकटाचे मूळ कारण सांगितले जात आहे. यामुळे वडाळा येथील सिटी गेट स्टेशन (CGS) मधून होणारा 'महानगर गॅस लिमिटेड' (MGL) चा पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील हजारो रिक्षा, टॅक्सी आणि सीएनजीवर चालणाऱ्या सगळ्या वाहनांना मोठा फटका बसला आहे.

नक्की वाचा: ज्येष्ठ नागरिकांसाठी 30% मालमत्ता कर सवलत खरी की खोटी? BMC ने दिलं स्पष्टीकरण

टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा फटका

सीएनजीचा पुरवठा विसकळीत झाल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सीएनजी पंपांवर लांबपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईतील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी या सीएनजीवरच धावतात. 'मुंबई टॅक्सीमेन्स असोसिएशन'चे नेते डी. ए. सालियन यांनी सांगितले की, अनेक टॅक्सी चालकांनी त्यांच्या गाड्यांमध्ये बदल करून पेट्रोलच्या टाकीचा पर्याय बंद केला आहे. सीएनजी मिळत नसल्याने काळ्या पिवळ्या टॅक्सी मंगळवारी मुंबईच्या रस्त्यावर फार तुरळक दिसत होत्या.  यामुळे टॅक्सीचालकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नक्की वाचा: मुंबई-नाशिक प्रवास 1 तासाने घटणार! ई- एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर

CNG पुरवठा पूर्ववत कधी होणार ? MGLने दिली महत्त्वाची माहिती 

'महानगर गॅस' ही मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी पुरवठा करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. एमजीएलने या आपात्कालीन स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी निवेदन प्रसिद्ध केले आहे. सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी घरगुती गॅस पुरवठा हा सुरळित राहावा याला प्राधान्य दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.  MMR क्षेत्रातील एकूण 389 सीएनजी पंपांपैकी सुमारे 60 टक्केच म्हणजे 225 पंपच सुरू असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. पंप सुरू असले तरी प्रेशर कमी असल्याने गाड्यांमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. यामुळे या पंपांवर गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत पुरवठा पूर्ववत होईल अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com