पुण्यात अल्पवयीन मुलानं पोर्शे कार चालवून केलेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला फक्त 15 तासांमध्ये जामीन मंजूर झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होते. या अपघातानंतर दोन दिवसांनी तपास यंत्रणा सक्रीय झालीय. त्यांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केलीय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत गृहखात्याची भूमिका स्पष्ट केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील अपघाताची घटना गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांकडं सर्व पुरावे आहेत. पोलिसांनी आरोपीवर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वय 17 वर्ष 8 महिने आहे. निर्भया प्रकरणानंतर कायदे बदलले आहेत. या प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींना सज्ञान मानावं अशी पोलिसांची भूमिका आहे. याबाबत बाल न्यायालयानं वेगळी भूमिका घेतली होती. त्यांनं अल्पवयीन आरोपीला 15 दिवस सामाजिक काम करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर लोकांमध्ये संताप वाढला. कोर्टाच्या या निर्णयाचा पोलिसांनाही धक्का बसला.पोलिसांनी या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर त्या कोर्टानं कनिष्ठ न्यायालयाला निर्देश दिले आहेत, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड )
अनेक पबमध्ये वयाची ओळखपत्र तपासली जात नाहीत. या प्रकरणानंतर सर्व पबमध्ये ओळखपत्र तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनी मुलांना योग्य दिशा द्यावी. स्वातंत्र्याचा स्वैराचार नको, याची खबरदारी घ्यावी. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मुलाचं वय वाहन चालवण्यासाठी आवश्यक वयापेक्षा कमी आहे, हे माहिती असूनही त्याला कार दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केलंय. पोलिसांना या प्रकरणाचे संपूर्ण CCTV फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत कुणी दबाव टाकत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले आहेत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : अल्पवयीन तरुणाची सरबराई भोवली, पुण्यातील 'त्या' बारवर मोठी कारवाई )
पुण्यात शनिवारी रात्री उशीरा भरधाव वेगानं पोर्शे कार चालवणाऱ्या तरुणानं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या तरुणावर निष्काळजीपणे गाडी चालवणे, जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता तसंच महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आ