जाहिरात

Pune News: वांद्रे रेल्वे स्टेशननंतर आता पुण्यात रेल्वे ॲक्शन मोडवर! या भागात बेकायदा बांधकामांवर पडणार हातोडा

Pune Railway: मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेने राबवलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेनंतर आता पुणे रेल्वे विभागानेही कडक पावले उचलली आहेत.

Pune News: वांद्रे रेल्वे स्टेशननंतर आता पुण्यात रेल्वे ॲक्शन मोडवर! या भागात बेकायदा बांधकामांवर पडणार हातोडा

Pune News: मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेने अलीकडेच राबवलेल्या मोठ्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या धर्तीवर, आता पुणे रेल्वे विभागानेही शहरातील अतिक्रमणांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. शिवाजीनगर ते खडकी दरम्यानच्या उन्नत मेट्रो कॉरिडॉरखाली असलेल्या रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे साफ करण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

या परिसरात रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्या व्यावसायिक आणि अन्य प्रतिष्ठानांना रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत नोटिसा बजावण्यात येत आहेत. नोटिसीची मुदत संपल्यानंतर ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा रेल्वे प्राधिकरणाने दिला आहे. उन्नत मेट्रो कॉरिडॉरखालील भागात सुरक्षा सुनिश्चित करणे, रेल्वे मालमत्तेचा अनधिकृत व्यावसायिक वापर रोखणे आणि रेल्वेच्या देखभाल कामांमध्ये येणारे अडथळे दूर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

(नक्की वाचा-  Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)

मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास होणार सक्तीची कारवाई

या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना पुणे रेल्वे प्रशासनाने सांगितलं की, शिवाजीनगर आणि खडकी मेट्रो स्थानकांदरम्यानच्या मेट्रो लाईनखालील रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या सुमारे 50 बेकायदेशीर प्रतिष्ठानांच्या मालकांना आतापर्यंत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जर संबंधितांनी नोटिसीची मुदत संपण्यापूर्वी स्वतःहून ही अतिक्रमणे हटवली नाहीत, तर रेल्वे प्रशासन सक्तीने ही जमीन रिकामी करण्याची कारवाई सुरू करेल.

रेल्वे प्रशासनाने अशा अनेक जागा शोधून काढल्या आहेत, जिथे रेल्वेच्या जमिनीचा विनापरवाना वापर केला जात आहे.  रेल्वेची मालमत्ता कोणत्याही बेकायदेशीर कब्जापासून मुक्त राहून ती सार्वजनिक आणि रेल्वेच्या कामांसाठीच वापरली जावी, असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

प्रवासी संघटनांकडून निर्णयाचे स्वागत

पुणे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह यांनी रेल्वेच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रवाशांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती, असे त्यांनी नमूद केले. .भविष्यात पुन्हा नवीन अतिक्रमणे उभी राहणार नाहीत, यासाठी अशा मोहिमा रेल्वेने नियमितपणे राबवल्या पाहिजेत," असे मत हर्षा शाह यांनी व्यक्त केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com