Pune News: पुणे शहरात वाहनांच्या नोंदणीने उच्चांक गाठला आहे. सध्याची 'MH-12' अंतर्गत असलेली दोन अक्षरी वर्णमाला (Alphabetical Series) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे येत्या 3 ते 4 महिन्यांत पुण्यात वाहनांना तीन अक्षरी नोंदणी क्रमांक देण्यास सुरुवात होणार आहे.
सध्याची स्थिती काय आहे?
पुणे आरटीओच्या माहितीनुसार, सध्याची दोन अक्षरी मालिका 'ZG' पर्यंत पोहोचली आहे. 'ZZ' पर्यंतचे मोजकेच पर्याय शिल्लक असल्याने, ही मालिका लवकरच संपुष्टात येईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत पुण्यात नोंदणीकृत वाहनांची संख्या 43.5 लाखांच्या पुढे गेली आहे. सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड वाहन खरेदी यामुळे उपलब्ध क्रमांकांचा साठा वेगाने संपत चालला आहे.
तीन अक्षरी मालिकेचे फायदे
पुणे आता दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांच्या यादीत सामील होईल, जिथे आधीच तीन अक्षरी मालिका लागू आहे. तीन अक्षरी कोडमुळे लाखो नवीन क्रमांकांचे पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्यातील अनेक वर्षे क्रमांकांची कमतरता भासणार नाही. भारतातील वाहन नोंदणी पद्धतीनुसार (राज्य कोड, आरटीओ कोड, वर्णमाला आणि 4 अंकी क्रमांक) हा बदल तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.
(नक्की वाचा- Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका)
प्रशासकीय तयारी
पुणे आरटीओने या नव्या मालिकेच्या अंमलबजावणीसाठी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (NIC) कडे परवानगी मागितली आहे. ही मंजुरी मिळताच सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करून नवीन मालिका सुरू केली जाईल. पुणेकर न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पुण्याची वाहन आकडेवारी
पुण्यात दुचाकी आणि खासगी चारचाकी वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादा आणि वाढते शहरीकरण यामुळे पुण्यात दरवर्षी हजारो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. या बदलामुळे वाहन नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.