जाहिरात

Pune News: स्वार्थासाठी आईनेच संपवलं 11 महिन्यांच्या लेकराला; हत्येचं कारण ऐकून पोलीसही सुन्न

Pune News: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका मातेनेच पोटच्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune News: स्वार्थासाठी आईनेच संपवलं 11 महिन्यांच्या लेकराला; हत्येचं कारण ऐकून पोलीसही सुन्न

अविनाश पवार, पुणे

Pune Crime News: आईच्या कुशीत बाळ सर्वात सुरक्षित असते असं म्हटलं जातं. मात्र एका आईने आपल्या 11 महिन्यांच्या चिमुरड्याला स्वार्थापोटी संपवल्याचे हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे घडली आहे. पूजा रवींद्र पवार असे या निष्ठुर मातेचे नाव असून, तिने आपल्या यश नावाच्या चिमुकल्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हत्येमागील विकृत कारण

पोलीस तपासात समोर आलेली माहिती ऐकून पोलीस अधिकारीही सुन्न झाले आहेत. आरोपी पूजा हिने दिलेल्या कबुलीनुसार,  तिला दुसरे लग्न करायचे होते. "मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न होणार नाही," या विकृत विचारातून तिने मुलाची हत्या करण्याचा कट रचला.

(नक्की वाचा-  Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)

रडण्याचा राग 

कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा यश सतत रडत होता. याचा राग मनात धरून तिने हे अमानुष पाऊल उचलले. 

हत्या केल्यानंतर थंड डोक्याने पुरावा नष्ट

आरोपी पूजाने आपला 11 महिन्याचा मुलगा यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता, गुन्हा लपवण्यासाठी तिने रक्ताचे डाग पाण्याने धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मृतदेह कपड्यांच्या बॅगेत कोंबला. तसेच बॅग पाण्यात बुडून राहावी म्हणून त्यात दगड टाकले आणि थेट शेतातील विहिरीत फेकून दिला. या सगळ्या गोष्टी आरोपी पूजा हिने अगदी थंड डोक्याने केल्या.

(नक्की वाचा-  Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)

आरोपी आईला अटक

सुरुवातीला हा प्रकार अपघाती मृत्यू किंवा मुलगा बेपत्ता असल्याचे भासवले गेले होते. मात्र, वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयावरून पूजाची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विहिरीतून यशचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

या घटनेनंतर भांबर्डे गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com