छत्रपती संभाजीनगरच्या घाटीतील नर्सिंग कॉलेजमधील तिसऱ्या सत्राच्या 19 विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घाटी प्रशासनाकडून चौथ्या व पाचव्या सत्रातील एकूण 11 विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच त्यांना वसतिगृहातूनही काढण्यात येणार असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या आणि पाचव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या सिनियर विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी 19 कनिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहात बोलावले. तसेच शिवीगाळ करत त्यांना गाणी म्हणायला लावली आणि मारहाण देखील केली होती. एका विद्यार्थ्याला ढकलून दिल्याने त्याचे डोके भिंतीवर आदळल्याने मुक्का मार लागला. जखमी झालेल्या मुलाने उपचार घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
(नक्की वाचा- पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?)
त्यानंतर हे सर्व प्रकरण घाटीच्या नर्सिंग प्रशासनाकडे गेल्याने चौकशी करण्यात आली. अँटी रॅगिंग कमिटीकडून चौकशी झाल्यावर गुरुवारी याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून रॅगिंग झाल्याचं शिक्कामोर्तब झाल्याने घाटी प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
गेल्या महिन्यात देखील असाच प्रकार
संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात गेल्या महिन्यात देखील असाच रॅगिंगचा प्रकार समोर आला होता. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना तृतीय वर्षातील विद्यार्थी चहा, कॉफी, नाष्टा सिगारेट आणायला सांगून त्रास देत होते. तब्बल तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा त्रास एका विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना सांगितला.
(नक्की वाचा - बांगलादेशमध्ये सत्तांतर, नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकार)
मुलाच्या वडिलांनी थेट घाटी प्रशासनाकडे धाव घेऊन या संपूर्ण घटनेची माहिती दिली. सोबतच अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानंतर चौकशी करून, तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांना 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world