Rainfall forecast for the next 2 Months : यंदाचं वर्ष हे अलनिनोचं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला होता. त्यामुळे पिकपाणी घटून संपूर्ण वर्षावर दुष्काळाची छाया असेल, असं भाकितही वर्तावण्यात आलं होतं. पण जून आणि जुलै या दोन महिन्यात पाऊस जरी अनियमित असला तरी पावसाने दोन महिन्यांची सरासरी जवळपास गाठली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने उरलेल्या दोन महिन्यांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज जरी चिंता वाढवणारा असला तरी पाऊस हा अंदाजसुद्धा चुकवेल, असा दावा काही हवामान अभ्यासक व्यक्त करतायत.
काय सांगतो भारतीय हवामान विभागाचा रिपोर्ट?
पावसाळ्याचे दोन महिने सरलेत. या दोन महिन्यात पावसाने सरासरी तूट भरून काढली. त्यामुळे पाणीटंचाईतून दिलासा मिळाला खरा, पण अनियमित बरसल्याने कुठे दुबार पेरणीचं संकट तर कुठे पूरस्थिती असं चित्र आहे. त्यामुळे पावसाचे उरलेले दोन महिने कसे असतील याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाळ्याच्या उर्वरित दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या तुलनेत 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही ‘आयएमडी'ने वर्तविली आहे. प्रशांत महासागरामध्ये सध्या मध्यम तीव्रतेचा एल निनो सक्रिय असून, वर्षाच्या अखेरपर्यंत त्याची तीव्रता सर्वोच्च पातळीपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर खरोखरच ऑगस्ट महिना कोरडा गेला तर खरीप पिकं आणि भाजीपाल्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न, ग्रामीण भागातील मागणी आणि अन्नधान्याच्या किमतींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही पावसाची तूट जर अधिक शेती असलेल्या प्रदेशात असली तर अन्नधान्याच्या किंमतीत भरमसाट वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सरकारवर आर्थिक ताण येण्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे.
पण आयएमडीचा हा अंदाज फोल ठरेल असा दावा खासगी हवामान अभ्यासक व्यक्त करतायत.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा काय आहे अंदाज?
राज्यात ऑगस्टमध्ये एक मोठा पाऊस होणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस राज्य धुमाकूळ घालणार आहे. एलनिनो वगैरे काही नसणार राज्यात खूप पाऊस पडणार. ३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. 13 नंतर मात्र थंडी सुरू होईल. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये सध्या कमी पाऊस झाला ती घट परतीचा पाऊस भरून काढेल. अहिल्यानगर,सांगली,सातारा, धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, बारामती, पुणे या जिल्ह्यात पाऊस कमी होत असला तरी परतीचा पाऊस ती उणीव भरून काढणार आहे, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले.
अर्थ मंत्रालयाच्या जुलै महिन्यातील मासिक आर्थिक आढाव्यानुसार, मान्सूनच्या कमकुवत सुरुवातीमुळे खरीप हंगामातील पेरणीचा वेग मंदावलाय. तसंच, शेवटच्या टप्प्यात एल निनो प्रभावी ठरल्यास शेतीसाठी धोका निर्माण होई शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आखाती युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यातच मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यात खरोखरच अनियमित पाऊस झाला तर भारताच्या आर्थिक वृद्धीदरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय महागाईचे चटकेही सहन करावे लागू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world