राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे नवी मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणसाठ्यात वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होतो.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावर्षी पावसाळा सुरू होऊनही 15 जून 2024 पर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये फक्त 26 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठ्यात वाढीव कपात करण्यात आलेली होती.
(नक्की वाचा- राज्यभर पावसाचं धुमशान; मराठवाड्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, काय आहे सद्यस्थिती?)
सध्या जुलै महिन्यात चांगल्या प्रकारे पर्जन्यवृष्टी होत असून आज 26 जुलै पर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस झालेला आहे. यामुळे मोरबे धरणामध्ये एकूण 74 टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे 15 जून पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेली पाणी कपात रद्द करण्यात येत आहे. 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहील.