बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणाचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांनी देखील यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःचं कौतुक करून घेणाऱ्यांनी तिचं रक्षण करणे आपलं पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, "बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं."
(नक्की वाचा- 'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप)
"मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही", असा टोला राज ठाकरे यांना CM एकनाथ शिंदे यांना लगावला.
"आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, पहिलं कर्तव्य नाही का?", असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा - महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?)
"जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे", असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.