बदलापुरात (Badlapur Protest) काल दिवसभर आंदोलन सुरू होतं. त्यासंबंधीचं वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याचा आरोप होत आहे. पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत त्यांनी भाष्य केल्याचा आरोप केला जात आहे. याविरोधात मोहिनी जाधव यांनी वामन म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ येथे पत्रकार असणाऱ्या मोहिनी जाधव या बदलापुरातील ज्या शाळेत घटना घडली त्या शाळेच्या ठिकाणी गेल्या होत्या. याच ठिकाणहून येत असताना वाटेत त्यांना वामन म्हात्रे भेटले. बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले वामन म्हात्रे मोहिनीला पाहता क्षणी थांबले आणि हे प्रकरण तुम्ही पत्रकारांनी पेटवले असल्याचे बोलू लागले. त्यानंतर मोहिनी आणि त्यांच्यात काही संवाद झाला. या संवादामध्येच त्यांनी मोहिनीला जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय, अशा बातम्या देत आहेस अशी भाषा वापरली. त्यानंतर मोहिनीला त्यांचे शब्द खटकले आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. तिने या प्रकरणात माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. वामन म्हात्रेंच्या वक्तव्याचा सारेजणं निषेध करत आहेत. महिला पत्रकाराने नगराध्यक्षाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा - Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक
दरम्यान वामन म्हात्रे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या लोकप्रतिनिधींना महिलांवरील अत्याचाराची जाणीव नाही ते काय न्याय मिळवून देणार असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
या प्रकरणा दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत वामन म्हात्रे यांना समज देण्यात येईल असं सांगण्यात आले. तरी म्हात्रेंवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world