महाकुंभनिमित्त जगभरातील भाविकांनी गंगेत पवित्र स्नान केले. मात्र राज ठाकरे यांनी प्रदूषित गंगेतील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. कोण जाऊन त्या गंगेत अंघोळ करेल. कोण ते गंगेचं पाणी पिणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गंगेच्या प्रदूषणावर राज ठाकरे यांनी बोट ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाकुंभनिमित्त आणि गंगेच्या प्रदूषणाबाबत राज ठाकरे यांनी म्हटलं की, "काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाची बैठक लावली होती. त्यात काहीजण हजर नव्हते. गैरहजेरीबद्दल मी प्रत्येकाला विचारलं. अनेकांनी नेहमीची कारणं सांगितली. पाच-सहा जणांनी सांगितलं महाकुंभला गेलो होते. बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले होते. मी म्हटलं मी नाही पिणार हे पाणी. महाकुंभचे मी व्हिडीओ पाहिलेत. त्यात दिसतंय माणसं, बायका घासून पुसून अंघोळ करत आहेत आणि बाळा नांदगावकर म्हणतायेत पाणी प्या. कोण पिणार हे पाणी."
"आताच कोरोना गेला. दोन वर्ष फडकी लावून फिरले आता तिथे जाऊन अंघोळ करतायेत. कोण जाऊन त्या गंगेत अंघोळ करेल आणि पाणी पिणार. श्रद्धेला पण काही अर्थ आहे का? एक नदी देशात स्वच्छ नाही राहिली आणि आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात लोक माता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आहेत. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार.मात्र गंगा काही साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर या", असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी उपस्थितांना केल.
जाणूनबुझून लोकांची टाळकी फिरवली जातायेत
महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला असून केवळ वाद लावण्याचे काम सुरु आहे. राजकारणासाठी मते मिळवण्यासाठी महाराष्ट्रात एकमेकांची डोकी फोडली जात आहेत, आग लावली जातेय, तरी आमच्या लोकांना हे कळत नाही. राज्यात जे काही सुरु आहे यावर मी 30 तारखेला सविस्तर बोलणार आहे. जातीपातीचे विषय, सोशल मीडियातून लोकांची टाळकी फिरवणे हे जाणूनबुजून सुरु आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
राजकीय फेरीवाले मनसेत नाहीत
मनसे पक्षाला आज 19 वर्ष झाली. ही वर्ष कशी गेली, काय गेली याचा विचार आपण करणार आहोत का? आज असंख्या पक्षांना प्रश्न पडलाय की यांचे आमदार आले, खासदार आले, अनेकदा पराभव झाले, मात्र या पक्षातील माणसे एकत्र कशी राहतात. राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. तिकडनं कुणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार. आपण आपला पक्ष मजबूत करु, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.