KDMC News: शिंदे गटाला पाठिंबा, राज ठाकरेंनी दिली होती संमती? राजू पाटलांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

राजू पाटील पुढे म्हणाले की, "केवळ 5 नगरसेवक असताना विरोधी पक्षात बसून आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो नसतो. सत्तेत राहून आम्ही किमान प्रशासनावर वचक ठेवू शकतो आणि विकासकामे मार्गी लावू शकतो."

जाहिरात
Read Time: 3 mins

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या अनपेक्षित युतीचे नेतृत्व मनसेचे माजी आमदार प्रमोद रतन पाटील (राजू पाटील) यांनी केले आहे. विशेष म्हणजे, वरळीच्या मैदानात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर, केडीएमसीत मात्र मनसेने शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंना पूर्वकल्पना होती का?

या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना राजू पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "कल्याण-डोंबिवलीतील एकूण आकडेवारीबाबत मी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पूर्णपणे कल्पना दिली होती. जेव्हा आम्ही केडीएमसीतील संख्याबळ आणि स्थानिक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली, तेव्हा त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले."

राजू पाटील पुढे म्हणाले की, "केवळ 5 नगरसेवक असताना विरोधी पक्षात बसून आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो नसतो. सत्तेत राहून आम्ही किमान प्रशासनावर वचक ठेवू शकतो आणि विकासकामे मार्गी लावू शकतो." त्यांच्या मते, केडीएमसीमध्ये सत्तेत स्थिरता असणे गरजेचे होते.

(नक्की वाचा-  Thackeray Brothers: ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतर झालेली युती तुटणार? महापालिका निकालानंतरची रणनीती कमी पडली?)

पाठिंबा देण्याचे नेमके कारण काय?

सध्या केडीएमसीमध्ये भाजपकडे 50 आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिथे 'हॉर्स ट्रेडिंग' (नगरसेवकांची खरेदी-विक्री) आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू होण्याची भीती होती. काही नगरसेवक बेपत्ता झाले होते, तर काही ठिकाणी अस्थिरतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत कल्याण-डोंबिवलीच्या जनतेला फोडाफोडीचे राजकारण नको आहे, हे ओळखून आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला," असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या वॉर्डातील विकासकामे मार्गी लागणे, हाच पक्षाचा मोठा फायदा असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

राजू पाटील यांनी पुढे म्हटलं की, निवडणुकीनंतरच्या परिस्थितीमुळे पुनर्विचार करायला भाग पाडले गेले. आम्ही मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निकाल लागल्यानंतर लगेचच काही नगरसेवक बेपत्ता झाले. त्यावेळी आम्हाला दोन्ही गटातील नगरसेवकांची काळजी होती. कल्याण-डोंबिवलीतील जनता पक्षांतराच्या राजकारणाला कंटाळली आहे आणि हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे," असे ते म्हणाले.

(नक्की वाचा-  KDMC News: अनाकलनीय! महायुतीला स्पष्ट बहुमत; मग शिवसेनेने मनसेचा पाठिंबा का घेतला? वाचा Inside Story)

काय म्हणाले संजय राऊत?

मनसेने शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, कल्याण डोंबिवलीचा हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. हा केवळ स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असे म्हणून चालणार नाही. एखादे स्थानिक नेतृत्व पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन काम करत असेल, तर पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे गरजेचे आहे. काँग्रेसने जसे भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या आपल्या 12 नगरसेवकांना पक्षाबाहेर काढले, तसाच कठोर निर्णय इथेही अपेक्षित असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.  संजय राऊत यांनी या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. काही लोक स्वार्थासाठी पक्ष सोडून जातात, अशा प्रवृत्तीबद्दल राज ठाकरेंनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article