गेल्या दोन दिवसांपासून कोकणात (Kokan Rain) तुफान पाऊस सुरू आहे. तळकोकणात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम असेल. सिंधुदुर्गासाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रायगडावर पावसाची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
रायगडावर तुफान पाऊस झाला असून येथे अनेक पर्यटक (Raigad Rain) अडकले होते. शेवटी रात्री उशीरा त्यांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रायगडाच्या महादरवाज्यावर पर्यटक अडकले होते. महादरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत होते. यामुळे पर्यटक मध्येच अडकले होते. पहिल्यांदाच अशा प्रकारे धबधबासदृश्य पाणी रायगडाच्या महादरवाज्यातून कोसळत असल्याचं दिसून आलं. शेवटी प्रशासनाच्या पुढाकाराने पर्यटकांची सुटका करण्यात आली.
नक्की वाचा - Rain Update : पुढील 4 तास धोक्याचे, मुंबई उपनगरासह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा
रायगडमधील तुफान पावसामुळे अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे आज जिल्हा प्रशासनाने सर्वांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
अलिबाग तालुक्यातील भिलजी, बोरघर, रामराज परिसरात मध्यरात्री ढगफुटी सारखा पाऊस झाला. या पावसाने गावातील घरांमध्ये कंबरभर पाणी झाले होते. वाहनेही पाण्याखाली गेली. अचानक झालेल्या पावसाने ग्रामस्थांची अक्षरशः तारांबळ उडाली. घरातील अन्नधान्य, इतर वस्तू भिजून नुकसान झालं. गावाशेजारून छोटी नदी वहात असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या अर्ध्या तासात गावात कमरेइतके पाणी झाले. पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.