लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागलं. या निकालाचं विश्लेषण केलं तर अनेक राजकीय तज्ज्ञांनी यामागे भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदेंसह आमदारांना भाजपने सोबत घेतलं, मात्र त्यानंतर राष्ट्रवादी फुटीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता तर संघानेही अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
संघ विचाराचे साप्ताहिक विवेकमधून भाजपमधील परिस्थितीवर भाष्य करणारा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखामध्ये भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्याच्या भूमिकेवर असंतोष व्यक्त करण्यात आला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधून भाजपचे कान टोचण्यात आले होते. त्यानंतर आता संघ विचाराचं साप्ताहिक असलेल्या विवेक साप्ताहिकातून भाजपविरोधातील नाराजी जाहीरपणे व्यक्त करण्यात आली आहे.
नक्की वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; गव्हाणेंसह 24 जणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
नेमक काय लिहिलंय साप्ताहिक विवेकमध्ये...
लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या.
हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच.