- केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया आणि चेतन व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा संशय पोलीसांना आहे
- साहिल गोयलची चौकशी करताना त्याने क्रिकेटच्या माध्यमातून चेतन आणि सियाशी झालेल्या ओळखीबाबत माहिती दिली आहे
- सियाला केतनशी लग्न नको होते आणि तिचे चेतनशी प्रेमसंबंध असल्याची माहिती साहिलकडे होती का?
सूरज कसबे
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. जस जसा तपास पुढे येत आहे तस तसे धक्कादायक बाबी समोर येताना दिसत आहे. केतन अग्रवालच्या हत्येमध्ये केवळ सिया आणि चेतन नव्हते तर तिसरी व्यक्ती ही यात सहभागी होती का? या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. तसा संशय ही त्यांना आला आहे. त्यानुसार पोलीस सियाचा भाऊ साहिल गोयल याची चौकशी करत आहेत. साहिलच्या चौकशीत त्यांने त्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे संशयाची सुई थेट साहिलच्या दिशेने वळल्याची चर्चा रंगली आहे.
तपास यंत्रणांनी अजून साहिलला आरोपी केलेले नाही. तरी त्याला या संपूर्ण प्रकरणाची आधीपासून कितपत कल्पना होती, यादृष्टीने आता पोलिसांचे लक्ष साहिलकडे वळले आहे. साहिल गोयलने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की क्रिकेट खेळताना त्याची चेतनसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर साहिलसोबत एक दिवस क्रिकेट सामना पाहण्यासाठी सिया गेली होती. त्यावेळी सियाची चेतन बरोबर ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या पार्श्वभूमीवर, सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधांची माहिती साहिलला आधीपासूनच होती का? असा पहिला संशय निर्माण होत आहे.
नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ
दुसरीकडे, गेल्या फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता. मात्र, सियाला हे लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिने ही गोष्ट साहिलला बोलून दाखवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे सियाला हे लग्न नको होते. तिचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते. हे ठाऊक असतानाही साहिलने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? हा दुसरा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून या सर्व कटाची माहिती साहिलला होती का किंवा तो स्वत: या कटाचा भाग होता का हे पोलीस तपासत आहेत.
यात भर म्हणजे, बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जात असताना सियाने घरातून निघण्यास नकार दिला होता. त्यावेळी साहिलनेच तिला जबरदस्तीने गाडीत बसवले होते. तशी साक्ष कार चालकाने दिली आहे. या प्रवासादरम्यान एका फूड मॉलमध्ये केतनचा पासपोर्ट फाडल्याचा आरोप आहे. ज्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केतनला त्याचा पासपोर्ट सापडला नव्हता. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर केतनचा पासपोर्ट अचानक गायब झाल्यावर साहिलला बहीण सियावर संशय आला नव्हता का? जर आला होता तर त्याने त्याच वेळी हा मुद्दा का लावून धरला नाही, असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
सध्याच्या स्थितीनुसार साहिल गोयल हा या गुन्ह्यात आरोपी नसून पोलिसांनी केवळ त्याचा जबाब नोंदवला आहे. मात्र, आता समोर आलेल्या या संशयास्पद मुद्द्यांमुळे साहिलच्या जबाबातून या प्रकरणाचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या नवीन प्रश्नांच्या उपस्थितीनंतर पोलीस चौकशी आता कोणत्या दिशेने जाते आणि केतन हत्या प्रकरणाचे गूढ कसे उकलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातून सिया ही भाऊ साहिलच्या जवळ होता. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगत होती याची ही चौकशी पोलीस करत आहेत. त्यातूनच तो तिसरा व्यक्ती कोण हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world