शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'सर्वधर्म समभाव' या संकल्पनेला 'नीचपणा' आणि 'नपुंसकत्व' असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीका केली. भीम आर्मीने देखील भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
भीम आर्मी आक्रमक
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा भीम आर्मीने तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, "संविधानाला विरोध करणे, भारत देशाच्या तिरंगा झेंड्याला विरोध करणे, आणि महाराष्ट्राचे सामाजिक धार्मिक वातावरण बिघडवणे अशा मनोहर भिडे यांचे सरकारने एन्काऊंटर केले पाहिजे." सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता भिडे यांच्या तोंडाला काळे फासेल, असा इशारा अशोक कांबळे यांनी दिला आहे.
(नक्की वाचा- Sambhaji Bhide News: 'सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा', संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान)
काय म्हणाले संभाजी भिडे?
संभाजी भिडे यांनी 'सर्वधर्म समभाव' या संकल्पनेवर टीका करताना म्हटले होते की, "सर्वधर्म समभाव हा निखळ ना पुरुष ना स्त्री असा प्रकार म्हणजे नपुंसक. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे हे शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्वधर्म समभाव हा निचपणा आहे." असे म्हणून त्यांनी सर्वधर्म समभावाची तुलना नपुंसकत्वाशी केली.
(नक्की वाचा- Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल)
याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या जुन्या 'आंबा खाऊन मुलगा होतो' या वादग्रस्त वक्तव्याचाही पुनरुच्चार केला. "मी बोललो होतो आंबे खाऊन मूल होतात. आजही मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता, त्यावर माझा कोर्टात खटला सुरू आहे," असेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करू आणि तिरंगा फडकवू, पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असेही त्यांनी म्हटले.