अविनाश माने, मुंबई
महाविकास आघाडीत मनसे सहभागी होण्याच्या चर्चांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी म्हटलं की, राज ठाकरे स्वतः महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहेत. 'आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे किंवा झाली आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, हा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही. ईव्हीएम (EVM), निवडणूक आयोगातील गैरकारभार आणि सरकारी यंत्रणांवरील दडपशाही यासारख्या मुद्द्यांवर एकत्रितपणे आवाज उठवणे महत्त्वाचे आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
(नक्की वाचा- "महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं वचन"; शिंदेंच्या आमदाराने करुन दिली आठवण)
महाविकास आघाडीत कोणताही नवीन घटक सामील करायचा असल्यास नक्कीच एकत्रित बसून चर्चा करावी लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. राज्यातील काँग्रेसला स्वतःहून निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. याउलट, आम्ही सर्वजण महाराष्ट्रात निर्णय घेऊ.' याचा अर्थ, मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल, असे त्यांनी सूचित केले.
संजय राऊत यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत आणि त्यांची ही इच्छा आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची भूमिका आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राऊत यांनी केलेल्या या खुलासामुळे, आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण एका नव्या वळणावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.