
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आक्रमक होत असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सत्तार यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वचनाची आठवण करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आम्ही तिन्ही सत्ताधारी पक्षांनी जाहीरनाम्यात वचन दिले होते. त्यामुळे गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने कर्ज काढावे आणि दिलेले वचन पाळले पाहिजे.' सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना सरकारला पुन्हा एकदा कात्रीत पकडण्याची संधी मिळाली.
सत्तार यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर म्हटले की, 'आमचा जाहीरनामा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, ते कमिटमेंट पक्कं आहे. शेतकऱ्यांच्या बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कारण आपल्या तिन्ही सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आपलं वचन आहे आणि त्या वचननामाला कोणताही तडा जाऊ दिला जाणार नाही, ही ग्वाही सरकारच्या वतीने देतो.' त्यांनी पुढे असेही म्हटले की, 'आम्ही दिलेले आश्वासन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केले पाहिजे. जशी आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, पहिल्यांदा शेतकरी पाठबळ दिलं पाहिजे'.
'कर्जमाफी झाल्यावरच आम्ही जबाबदारीतून मुक्त होऊ'
आमदार अब्दुल सत्तार यांनी या मुद्द्यावर आपल्याच पक्षाला राजकीय वास्तवतेची जाणीव करून दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनाच्या जबाबदारीतून आपण सुटलेलो नाही. 'ज्यावेळी कर्जमाफी होईल, त्यावेळीच दिलेल्या शब्दाच्या जबाबदारीतून आपण मुक्त होऊ,' असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला सल्ला दिला की, 'गरज पडल्यास कर्ज काढू, आम्ही सरकारला विनंती केली. काही कर्ज काढण्याची गरज असेल, तर आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आपण कर्ज घेऊ शकतो.'
शेतकरी बांधवाला दिलेला शब्द पाळल्यास, पुढच्या निवडणुकीत देखील शेतकरी आम्हाला पाठिंबा देतील. अन्यथा, 'एक बोट तिकडे आहे, तर तीन बोट आपल्याकडे आहे, हेही आपण पाहिले पाहिजे,' असे सूचक विधान करून त्यांनी इशारा देखील दिला आहे. आधीच शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले असताना, सत्तार यांनीच सत्ताधारी पक्षांना कर्जमाफीची आठवण करून देऊन, गरज पडल्यास कर्ज काढण्याचा सल्ला दिल्याने, येणाऱ्या काळात या वक्तव्यावरून मोठी राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world