Eknath Shinde Delhi Tour: विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा कशासाठी होता याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, "गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले. दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!"
(नक्की वाचा- Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक आणि आगामी निवडणुकीत युती झाल्यास याचा शिंदेंच्या शिवसेनेला फटक बसण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणात टार्गेट केले जात आहेत, अशा विषयांवरही एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
उदय सामंतांचा प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे हे दिल्लीत अमित शहा यांना भेटले यात चुकीचं काय आहे. एनडीए सरकारमध्ये आहोत, आमचे नेते त्यांना भेटतात. आयकर नोटीस संदर्भात किंवा राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची भेट घेतलेली नाही. शिंदे आणि आमच्या पक्षाला ट्रोल करणारे उबाठा यांना जनतेन निवडणुकीत ट्रोल केले विसरू नका, असा टोला देखील सामंत उदय यांनी लगावला.