जाहिरात

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्यात 'ब्लॅक पँथर', दुर्मीळ दृश्य; बिबट्या असूनही रंग काळा का?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘ब्लॅक पँथर’ अर्थात काळा बिबट्या कैद झाला आहे.

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्यात 'ब्लॅक पँथर', दुर्मीळ दृश्य; बिबट्या असूनही रंग काळा का?

राहुल तपासे, प्रतिनिधी

Satara News : सह्याद्रीच्या दाट अरण्यातील जैवविविधतेचा आणखी एक दुर्मीळ पुरावा समोर आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘ब्लॅक पँथर' अर्थात काळा बिबट्या कैद झाला आहे. या दुर्मीळ दृश्यामुळे वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांग परिसरात आढळणारे काळे बिबटे (मेलॅनिस्टिक बिबटे) अत्यंत दुर्मीळ आणि लपून राहणारे प्राणी मानले जातात. तिलारी, राधानगरी तसेच रत्नागिरी भागात यापूर्वीही त्यांची नोंद झाली असली, तरी कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद होणे ही महत्त्वाची बाब मानली जाते. या प्रदेशातील जास्त पर्जन्यमान, दाट जंगल आणि सावलीमुळे त्यांच्या गडद कातडीला नैसर्गिक छलावरण मिळते.

नक्की वाचा - Satara News : साताऱ्याचं चित्र बदलणार! मंत्रिमंडळाच्या एका निर्णयामुळे मुंबई-पुण्यात जाण्याची गरज संपणार...

ब्लॅक पँथर बिबट्याचाच प्रकार तरीही काळा रंग का? l (why black panther is black?)

तज्ज्ञांच्या मते, ‘ब्लॅक पँथर' ही वेगळी प्रजाती नसून बिबट्या याचाच एक प्रकार आहे. जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्यांच्या अंगावरचा रंग गडद होतो, ज्यामुळे ते काळे दिसतात. ब्लॅक पँथरचा रंग काळा होण्याचं मुख्य कारण मेलानिझम आहे. मेलॅनिझम हे एक जनुकीय उत्परिवर्तन आहे ज्यामुळे  त्वचा गडद होते. बिबट्यांमध्ये, हे वैशिष्ट्य एका अप्रभावी जनुकांमुळे, तर जग्वारमध्ये एका प्रभावी जनुकांमुळे आढळते. ते बहुतेकदा घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात, जिथे हा गडद रंग त्यांना शिकार करण्यास आणि लपण्यास मदत करतो.  अशा प्रकारचे बिबटे विशेषतः ओलसर, सदा हरित जंगलांमध्ये अधिक आढळतात.

जागतिक स्तरावर महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाटामध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती, प्राणी आणि पक्षी प्रजाती आढळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा या समृद्ध परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग असून येथे लुप्तप्राय आणि स्थानिक प्रजातींचे संरक्षण केले जाते. दरम्यान, या कॅमेरा ट्रॅपमधील नोंदीमुळे सह्याद्री परिसरातील वन्यजीवांच्या अस्तित्त्वाला बळकटी मिळत असून या भागातील संवर्धन प्रयत्नांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. वन विभागाकडून या भागातील निरीक्षण आणि संरक्षण अधिक बळकट करण्याचे संकेत मिळत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com