अमजद खान, कल्याण
महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वपार चालत आलेली घराणेशाहीची परंपरा अलीकडच्या काळात आणखी जोमाने वाढताना दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने याचे पुन्हा एकदा प्रत्यंत्तर येताना दिसत आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये सर्वच पक्षाच्या राजकारण्यांकडून आपापल्या घरातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत याचा कळस गाठला गेला आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एका घरातील दोन-तीन नव्हे तर सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांचे स्थान फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का? या शंकेने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे.
एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे. वामन म्हात्रे यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. 2015 मध्ये सुद्धा वामन म्हात्रे यांच्या परिवारातील 4 जणांना महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेच्या तिकीट वाटपानंतर बदलापूरमधील भाजप नेत्यांनी या सगळ्या प्रकारावर टीकास्त्र सोडले आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आधीच स्पष्ट केले होते की, ज्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. त्याठिकाणी आमच्या पक्षाला उमेदवार मिळत नव्हते. कार्यकर्त्यांची भावना होती की, त्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्या प्रभागत अन्य कोणी उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो. कार्यकर्त्यांची भावना पाहता त्या प्रभागत नातेवाईकांना उमेवदारी दिली आहे.
(नक्की वाचा- Dr. Gauri Garje Case: आत्महत्येची थेट शक्यता नाही, पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; तपास 4 मुद्द्यांवर सुरु)
"त्यांनी जे काही केले त्यावर जनता निर्णय घेईल"
यासंदर्भात भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, "हे खरं म्हणजे स्वत:ला कळायला पाहिजे. आता सहा कार्यकर्ते त्याठिकाणी बसले असते. पण पहिजे तेव्हढे मला लूटायला. लूट शाही असेल तर ते बरोबर नाही. त्यांनी जे काही केले त्यावर जनता निर्णय घेईल."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world