2 शिवसेना 2 वर्धापन दिन! शिवसेना 58 वर्षांची झाली पण...

या 58 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली. एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहीली तर दुसरी एकनाथ शिंदेंकडे. शिवसेनेतल्या फुटीनंतर होणार हा दुसरा वर्धापन दिन आहे.

Advertisement
Read Time: 5 mins
मुंबई:

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली. तो दिवस होता 19 जून 1966. या संघटनेला आता 58 वर्षे झालीत. या 58 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली. एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहीली तर दुसरी एकनाथ शिंदेंकडे. शिवसेनेतल्या फुटीनंतर होणार हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याचीही दुसरी वेळ आहे. या 58 वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले. शिवसेना विभागली गेली. दोन गट पडले. पण त्यातून साध्य काय झाले याचाच विचार मराठी माणूस करत असेल. ज्याच्या न्याय हक्कासाठी ही संघटना स्थापन झाली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरेंचा वर्धापन दिन जोरात 

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संघटना ही आपल्याच बाजूने असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. निवडणूक आयोगाने मुळ पक्ष आणि चिन्ह हे शिंदेना दिले. असे असले तरी ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह जरी सोबत नसले तरी संघटन हे आपल्या बरोबर असल्याचे उद्धव यांनी दाखवून दिले आहे. लोकसभेच्या नऊ जागा ठाकरे यांनी जिंकल्या. तर एक जागा थोड्या फरकांनी हरली. शिवाय ठाकरेंच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवारांनाही झाला. त्यामुळे ठाकरे गट उत्साहात आहे. त्यामुळे हा वर्धापन दिन ते जोरात करत आहेत. त्याची जय्यत तयारी केली असून हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. यावेळी ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारी आहेत. शिवाय ते विधानसभेचे रणशिंगही वर्धापन दिनीत फुकतील.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता समोर आला, थेट बोलला

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेचे शक्तीप्रदर्शन 

वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेही शक्तीप्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदार संघ असलेल्या वरळीत ते वर्धापन दिन साजरा करत आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंना अपेक्षित यश मिळवता आले नाही. 15 जाग लढून केवळ 7 जागा त्यांना जिंकता आल्या. पण भाजप आणि राष्ट्रवादी पेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त हीच काय ती शिंदेंची जमेची बाजू. त्यातूनच युतीत आम्हीच मोठे भाऊ अशीही चर्चा सुरू झाली. हा मुद्दा धरून शिंदे कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल. दरम्यान नव्याने निवडून आलेल्या सात खासदारांचा सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला आहे. शिंदे ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकतील.     

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

लोकसभेत ठाकरेंची सरशी 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिली निवडणूक झाली ती लोकसभेची. या निवडणुकीत शिवसैनिक नक्की कोणाच्या बाजून आहेत हे समजणार होते. यात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. आधी जागा वाटपास महाविकास आघाडीत आधीक जागा पदरात पाडून घेतल्या. त्या तुलनेत शिंदेंच्या वाट्याल अवध्या 15 जाग आल्या. निकालानंतर शिंदेंना 7 जागांवर समाधान मानावं लागलं तर ठाकरेंनी 9 जागांवर मुसंडी मारली. तर एक जागा अवघ्या 42 मतांनी हरली. शिवाय मुंबईत ठाकरेंचीच ताकद असल्याचेही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. शिंदेसाठी हा तसा मोठा धक्का मानला जातो. मात्र यातून ठाकरे गटाचा उत्साह कमालीचा वाढला आहे. त्याचा फायदा विधानसभेसाठी नक्कीच होईल अशी शिवसेना नेत्यांची भावना आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय बोलणार? पक्षाची पुढची दिशा काय असणार? मविआचं काय होणार? पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? यावर ठाकरे काही भाष्य करतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडलं, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

58 वर्षांत शिवसेनेना किती बदलली?

बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षा पूर्वी 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. स्थापने पासून आता पर्यंत शिवसेनेने अनेक चढ उतार पाहीले. मुंबई पुरता मर्यादीत असलेल्या या संघटनेचा विस्तार हळूहळू राज्यभर झाला. मुंबई आणि कोकण ही शिवसेनेची बलस्थानं राहीली. बाळासाहेबांचा संघर्ष, मराठी माणूस, हिंदूत्व आणि भाजप बरोबर केलेली युती या जोरावर 1995 साली पहिल्यांदाच राज्यात युतीचे सरकार आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्या आधी शिवसेनेत एक मोठी फुट पडली. छगन भुजबळ हे डझनभर आमदार घेवून काँग्रेसवासी झाले. शिवसेनेवर झालेला हा पहिला मोठा आघात होता. 1995 ते 1999 पर्यंत राज्यात युतीचे सरकार होते. यात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. एक मनोहर जोशी आणि दुसरे नारायण राणे. मात्र 1999 ला युतीची सत्ता गेली. काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापन केले. पुढे नारायण राणे यांनी बंड केले. शिवसेनेत दुसरी मोठी फुट पडली. राणेही 12 आमदार घेवून बाहेर पडले. राणेंचे बंड झाले दुसरीकडे राज ठाकरे यांनीही बंडाचे निशाण फडकवत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता महाराष्ट्र नव निर्माण सेना हा नवा पक्षा स्थापन केला. शिवसेनेला लागोपाठ लागलेले हे धक्क्यावर धक्के होते. हे धक्के शिवसेने पचवले. शिवसेनेचे नेते गेले पण संघटना तिथेच होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वाचा कस याच वेळी लागला. पुढे बाळासाहेबांचे निधन झाले. संपुर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आली. युत तुटली. त्यातही शिवसेनेचे 62 आमदार ठाकरेंनी निवडून आणले. 2019 साली तर राजकीय स्थितीचा फायदा घेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भाजपची सत्ता गेली. पण अडिच वर्षानंतर शिवसेनेत भूकंप आला. या आधी शिवसेनेला धक्के बसले होते. पण आता मोठा भूकंपच झाला. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत जवळपास 40 आमदारांना घेवून पक्षच आपल्या ताब्यात घेतला. जवळपास 12 खासदार शिंदेंकडे गेले. शिवसेनेतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी फुट होती. पुढे निवडणूक आयोगानेही शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना समजून त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उद्धव यांच्याकडे राहीला. त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले. आता एकाच पक्षाचे हे दोन तुकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे भविष्यात या शिवसेनेचे काय होते हे काळच ठरवेल.        
 

Topics mentioned in this article