राज्यातील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर भारतीय जनता पार्टीत जोरदार घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली होती. त्यावर फडणवीस यांना सरकारमध्ये राहण्याचे आदेश भाजपा हायकमांडनं दिले. त्यापाठोपाठ आज (मंगळवार, 18 जून) रोजी दिल्लीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा झाली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि माजी अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीला राज्यातून भाजपचे सात बडे नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार हे नेते या बैठकीला उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पक्षाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. कोणत्याही ररिस्थितीमध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत विधानसभा निवडणूक जिंकण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील घटक पक्षांसोबत लढणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.' लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्येही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली होती. पण, त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांची युती कायम राहणार आहे, हे फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे.
( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
या बैठकीत महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर विस्तारानं चर्चा झाली. तसंच आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीच्या ब्लू प्रिंटवर चर्चा झाली. आता महायुतीच्या अन्य पक्षांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीसह सर्वशक्तीनं लढणार आहोत. केंद्रीय समिती या निवडणुकीत आमच्या पाठीशी आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा? )
महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे महाआघाडीचे सरकार ताकदीने स्थापन करायचे आहे, असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा मिळालेल्या भाजपाला या निवडणुकीत फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. राज्यात बसलेल्या या सेटबॅकनंतर कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय होऊ शकतो, असं मानलं जात होतं. पण, या बैठकीत तरी कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world