अमजद खान, कल्याण
कल्याण-डोंबिवलीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त आहेत. महापालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे तसे झाले नाहीत. आता गणेशोत्सव सुरू होणार आहे. या दरम्यान एखादी दुर्दैवी घटना घडली, शहरात शांतता भंग झाली तर यासाठी फक्त आणि फक्त केडीएमसी आयुक्त जबाबदार राहतील. नंतर आम्ही आमच्या परीने बघून घेऊ, असा इशारा कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याआधी कोट्यवधीची निधी खर्च केला जाणार असा दावा दरवर्षी प्रशासनाकडून केला जात होता. मात्र पाऊस सुरू होताच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण-नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलावर तसेच कल्याण-शीळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते.
कल्याण-शीळ रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे तीन वेळा एका शाळेत सुट्टी देण्याची वेळ आली आहे. शहाड पुलावर खड्ड्यांमुळे दररोज सकाळी एक ते दीड तास वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे अपघात होतात, नागरिक जखमी होतात, नागरिकांकडून वारंवार खड्ड्यांबाबत तक्रार केली जाते. महापालिका किंवा संबंधित विभाग नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात हे दिसून आले आहे.
(नक्की वाचा - Hingoli Rain : हिंगोलीला पावसाने झोडपलं; नदी-नाल्यांना पूर, अनेक सखल भागांत पाणी साचलं)
Potholes
तक्रार करुनही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
कल्याण डोंबिवलीतील मनसे आमदार राजू पाटील आणि कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. आयुक्तांना भेटून खड्ड्यांमुळे होणारा त्रासाबद्दल प्रशासनाला सांगितले आहे. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आता गणेशोत्सव सुरू होणार आहे, मात्र खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली होती की पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील सर्व खड्डे भरले पाहिजे. मात्र आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.
सात दिवसात खड्डे भरण्याचे काम झाले नाही. कल्याण पश्चिमेतील विविध काँक्रिटीकरण रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विश्वनाथ भोईर खड्ड्यांप्रश्नी संतापले. विश्वनाथ भोईर यांनी म्हटलं की, "त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना सूचना केली होती. मात्र प्रशासनाने खड्डे भरले नाही असे दिसत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. परंतु आता गणेशोत्सव सुरू झाला आहे. खड्ड्यांमुळे काही घटना घडली. शहरात शांतता आहे ती बिघडेल."
(नक्की वाचा - जोडे मारो आंदोलन, मविआचा मोर्चा पोलीस रोखणार? हुतात्मा चौकात काय स्थिती?)
"घटनेमुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर यासाठी दुसरा कोणी नाही केडीएमसी आयुक्त जबाबदार राहणार. एवढेच नाही तर विश्वनाथ भोईर यांनी एका प्रकारे केडीएमसी प्रशासनाला सज्जड दम दिला आहे. काही घटना झाली तर आम्ही आमच्या परीने बघून घेणार", या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.