उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ ठाण्यात आज धडाडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून काही बॅनर्स लावून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीकडून सातत्याने उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्यावरून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच आता ठाण्यात देखील उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पायाखाली लोटांगण घालत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' असा मजकूर देखील लिहिला आहे. त्यामुळे आज ठाण्यात या बॅनर वरून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, "उद्धव ठाकरे यांचा सहकुटुंब लोणांगण दौरा पार पडला आहे. मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते. दिल्लीत त्यांना कोणीही भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांना नाचवू शकतो हे दाखवून दिले."
(नक्की वाचा- राज्यातील जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?)
संजय राऊतांचं प्रत्युत्तर
आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ज्याला सध्या बसवलेलं आहे ते लोटांगण घालूनच बसले आहेत. आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला. आम्ही दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते काय लोटांगण घालायला गेले होते का? असा सवाल संजय राऊत यांनी टीकाकारांना विचारला आहे.
(नक्की वाचा- Video - राज यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 'सुपाऱ्या' फेकल्या, मनसैनिकांनी धडा शिकवण्याचा 'विडा' उचलला)
पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली होती, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, असा उल्लेख यशवंतरावांचा करतो ते काय लोटांगण घालायला गेले होते का? उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांच्या जुलमी कारभाराशी, त्या मोगलाईला झुंज दिली, त्याला लोटांगण म्हणता येणार नाही, त्याला स्वाभिमान म्हणतात, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं.