Mumbai News : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी 'स्विगी'च्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेने मुंबईतील मरोळ येथील स्विगी कार्यालयाचे शटर बंद केले आहे. स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सीकडून पार्श्वभूमी तपासली जात नाही, ऑर्डरची फसवणूक, पैसे अडवण्याचा प्रकार, ग्राहक सेवा यंत्रणेत त्रुटी, हॉटेलची माहिती लपवणे, अरेरावीची उत्तर असे गैरप्रकार प्रकार स्विगीकडून सुरू असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे. आठवडाभरात यात बदल झाला नाही तर मुंबईत स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही, असा इशारा शिवसंचार सेनेचे अध्यक्ष आणि राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसंचार सेनेचे स्विगीला पत्र
अखिल चित्रे यांनी स्विगीच्या व्यवस्थापनाला पत्र लिहित म्हटलं की, "आमच्या महाराष्ट्राच्या मातीत, इथल्या खाद्य संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचा नव्हे, तर श्रद्धेचा, पावित्र्याचा विषय आहे. या पवित्र अन्नाबाबत जर हलगर्जीपणा झाला, तर तो केवळ ग्राहकांचाच नव्हे, तर इथल्या खाद्य संस्कृतीचा अपमान आहे."
"स्विगीचा महाराष्ट्रात व्यवसाय बहरला, तो इथल्या लोकांच्या समजूतदारपणामुळे, सुसंस्कृतपणामुळे आणि विश्वासामुळे. पण स्विग्गीला ह्याची जाणीव नाही असं तुमच्या सेवेतून उघडपणे दिसतं. कारण तुमच्याकडून ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली सुरू आहे आणि हे आम्ही शिवसैनिक म्हणून मुळीच सहन करणार नाही", असंही चित्रे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - Pahalgam Video: पहलगाम हल्ल्याचा सर्वात भयानक Video समोर, गोळ्या लागत होत्या, लोक कोसळत होते))
"अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या, आमचा संयम संपत चालला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करताना ग्राहकांचं सर्वतोपरी असायला हवं. जर स्विगीने तात्काळ सुधारणा केल्या नाहीत, तर शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी ताकीदही शिवसंचार सेनेने दिली आहे.
शिवसंचार सेनेच्या निदर्शनास आलेल्या गंभीर त्रुटी
ऑर्डरची फसवणूक : तुमचं अॅप अन्नपदार्थ व हॉटेलची उपलब्धता न पडताळता ऑर्डर स्वीकारतं, पैसे घेतं आणि नंतर "हॉटेल बंद" सांगून ऑर्डर रद्द करतं. ही सरळ सरळ ग्राहकांची थट्टा आहे.
पैसे अडवण्याचा प्रकार : ऑर्डर रद्द केल्यानंतर 3-5 दिवस पैसे परत करण्याचा फाजील नियम लावता. ही ग्राहकांची आर्थिक लूट आहे. पैसे घेताना क्षणार्धात घ्यायचे आणि परत करताना विलंब का? लोकांचे पैसे अडवून त्याचा गैरवापर केला जातोय का? हि कसली व्हाइट कॉलर दरोडेखोरी? एखाद्याकडे तितकेच पैसे असतील तर त्या गरिबाने काय करावं?
डिलिव्हरी एजंट्सची पार्श्वभूमी तपासणी : तुम्ही 'घरपोच सेवा' पुरवता अशा स्थितीत तुमच्या दूतांबद्दल लोकांमध्ये विश्वास हवा. त्यामुळे तुमच्या डिलिव्हरी बॉईजची शहानिशा होते का? भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी स्विगीची राहील, हे लक्षात ठेवा.
ग्राहक सेवा यंत्रणेत त्रुटी : chatbot द्वारे टोलवाटोलवी केली जाते. चॅट्स ताबडतोब रद्द केले जातात. इंग्रजीत संवाद साधला जातो. म्हणून महाराष्ट्रात मराठीत ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त करा.
हॉटेलची माहिती लपवणे : अन्न कुठून येते याची खरी माहिती लपवली जाते. फक्त अन्नाची छायाचित्रं दाखवून, ग्राहकांची दिशाभूल केली जाते. हॉटेलचा फोटो, त्याची स्वच्छता, दर्जा ग्राहकांना माहीत असायला हवा. हा त्यांच्या सुरक्षिततेचा मूलभूत हक्क आहे.