BMC Election 2025: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेना ठाकरे गटाने एक मोठी आणि महत्त्वपूर्ण रणनीती आखली आहे. पक्षाला नवी दिशा देण्यासाठी आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी या निवडणुकीत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी दिली जाणार नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
नवीन पिढीला संधी, जुन्यांचा आदर
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या या नव्या धोरणामुळे सुमारे 70 टक्के नवे आणि तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील. यामुळे पक्षात नव्या उत्साही नेतृत्वाचा सहभाग वाढेल, तसेच पक्षाचे कार्य अधिक गतिमान होईल.
मात्र, पक्ष या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांना बाजूला करणार नाही. 60 वर्षांवरील माजी नगरसेवकांना थेट उमेदवारी दिली जाणार नसली तरी, त्यांच्या मतांचा आदर राखला जाईल. त्यांच्या वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव आणि पक्षातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्यावर पक्ष नेतृत्वाचा विचार सुरू आहे. या समन्वयवादी भूमिकेमुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखला जाईल.
(नक्की वाचा- Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट)
शिवसेना-मनसे युतीचे संकेत आणि जागावाटप
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची अधिकृत घोषणा केली नसली तरी, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्याची माहिती आहे. या बैठकांमध्ये महापालिका निवडणुकीतील रणनीती आणि जागावाटपावर विचारमंथन झाले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक वॉर्डातील पक्षाची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याचे संकेत दिले आहेत.
माजी नगरसेवकांचे स्थलांतर आणि नवीन संधी
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या होत्या. परंतु, राज्यातील सत्तासंघर्षानंतर यातील अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, त्यांच्या जागी पक्षाला नवीन आणि निष्ठावान चेहरे मैदानात उतरवणे आवश्यक झाले आहे. 60 वर्षांवरील नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्याचा आणि 70% नवे चेहरे देण्याचा हा निर्णय याच धोरणाचा एक भाग मानला जात आहे. यामुळे पक्षाला तरुण आणि नव्या दमाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.