जाहिरात
This Article is From Apr 08, 2024

ईडीचं समन्स आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, आम्ही....

BMC Khichadi Scam : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) अडचणीत सापडले आहेत

ईडीचं समन्स आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, आम्ही....
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) अडचणीत आले आहेत. (फोटो : @AmolGKirtikar/X)
मुंबई:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकर अडचणीत सापडले आहेत. किर्तीकर  यांना ईडीनं समन्स पाठवलंय. कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत कीर्तिकर यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

काय म्हणाले किर्तीकर? 

अमोल किर्तीकर  यांनी ईडीचं समन्स आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मला समन्स आला आहे त्यानुसार मी चौकशीला सामोरं जात आहे. गेल्यावेळी समन्स आलं होतं त्यावेळी काही कारणांमुळे जाऊ शकलो नव्हतो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समन्स आला म्हणजे यात सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आली आहे, हे तुम्ही समजू शकता. मी माझ्या पक्षप्रमुखांची  भेट घेतली आहे. संपूर्ण शिवसेना पक्ष आणि इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे,' असं किर्तीकर यांनी सांगितलंय.  

आपण 8 तारखेपर्यंत प्रचार केलाय. त्यासाठी जीवनशैलीतही बदल केलाय. ईडीच्या चौकशीला हजर राहण्यापूर्वी प्रचार जवळपास पूर्ण केला आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांचीही मानसिक तयारी केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


काय आहे खिचडी घोटाळा?


कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारनं घेतला होता. या कामगारांना खिचडी देण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेनं काही कंपन्यांना दिलं होतं. या कंपन्यांनी केलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी सध्या सुरु आहे. 

यापूर्वी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अमोल किर्तीकर आणि  सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाणला ईडीकडून अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ ईडीनं अमोल किर्तीकर यांना चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com