Sanjay Raut Letter to Amit Shah: शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनामा आणि निघून जाण्यावर चिंता व्यक्त केली आहे. याबाबत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिले आहे. 10 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेल्या या पत्रात राऊत यांनी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षिततेबद्दल आणि सध्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मागितली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात 21 जुलै रोजी झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, या दिवशी सकाळी 11 वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. कामकाजादरम्यान ते सामान्य आणि ठीक दिसत होते.
(नक्की वाचा- कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे)
मात्र, संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक उपराष्ट्रपतींनी तब्येतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी घोषणा करण्यात आली. ही बाब धक्कादायक होती, असे राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर, राऊत यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
- गेल्या काही दिवसांपासून उपराष्ट्रपती कुठे आहेत?
- त्यांचे आरोग्य कसे आहे?
- ते सुरक्षित आहेत का?
राऊत यांच्या मते, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा अधिकार जनतेला आहे. राज्यसभेतील काही सदस्यांनी उपराष्ट्रपतींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
(नक्की वाचा- Bhaskar Jadhav: 'भिडा, नडा, एकटा बास', ब्राम्हण समाज अन् भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत का?)
'हेबिअस कॉर्पस' दाखल करण्याचा विचार
राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "दिल्लीत अशा अफवा सुरू आहेत की, जगदीप धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नाहीत. ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात'हेबिअस कॉर्पस' याचिका दाखल करण्याचा विचार करत असल्याचेही पत्रात सांगितले आहे. मात्र, त्याआधी गृहमंत्र्यांकडून माहिती घेणे योग्य वाटले. उपराष्ट्रपतींच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.