अमजद खान, कल्याण
Kalyan News: दाल वडा देण्यात उशीर केला म्हणून सराईत गुन्हेगाराने दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकारण कल्याणमधून समोर आला आहे. त्यानंतर त्याला हात जोडून पाया पडायला लावले. हा संपूर्ण थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण पूर्वेकडील नितीन राज हॉटेलच्या बाजूला असलेल्या वडा-इडलीच्या दुकानावर शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी दिनेश लंकेचा कसून शोध सुरु केला आहे.
दारूच्या नशेत आलेला सराईत गुन्हेगार दिनेश लंके याने हॉटेल मालक बचाराम गोर्या यांच्याकडे 'मला दाल वडा बनवून दे' अशी मागणी केली. गोर्या यांनी 'थोडा वेळ थांबा' असे सांगितल्यावर लंकेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात लंकेने गोर्या यांना शिवीगाळ केली आणि मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पाहा VIDEO
दुकानदाराने सुरुवातीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लंके अधिक आक्रमक झाला. त्याने त्वरित हत्यार काढून दुकानदाराला धमकावले. या गुंडगिरीपुढे हतबल झालेल्या हॉटेल मालकाला लंकेने चक्क हात जोडून पाया पडायला लावले. हा संपूर्ण थरार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला.
(नक्की वाचा - Akola News: धावत्या एसटी बसची 2 चाकं झाली वेगळी, त्यानंतर चालकाने जे काही केलं ते...)
आरोपी दिनेश लंके हा कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार असून, काही दिवसांपूर्वीच तो एका जुन्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून बाहेर आला आहे. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा एकदा परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून अशा गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली जात आहे.