सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Viral News Today : साईनगरी शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांविरोधात आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलंय. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची फुलं,हार आणि प्रसादाच्या नावाखाली सर्रास आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर शिर्डी नगर परिषदेनं मोठी कारवाई सुरू केली आहे. भाविकांना हजारोंचा गंडा घालणाऱ्या फुलभांडार दुकानांवर आता थेट टाळे ठोकण्याची कारवाई होत आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडासह दुकान बंद ठेवण्याची शिक्षा दिली जाते.
साई मंदिरा जवळ असलेल्या काही फुलभांडार दुकानांमध्ये हार,फुलं आणि प्रसादाच्या वस्तू चढ्या दराने विकून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. काही ठिकाणी अवघ्या दोनशे रुपयांच्या सामानासाठी दोन हजार रुपये उकळले जात असल्याच्या गंभीर तक्रारी नगर परिषदेकडे दाखल झाल्या होत्या.
शिर्डी नगर परिषदेकडून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
याच पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेनं फसवणूक करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाईचा सपाटा लावलाय.पहिल्यांदा गैरप्रकार आढळल्यास पाच हजार रुपये दंड आणि दुकान सात दिवस सील राहणार. दुसऱ्यांदा दहा हजार दंड आणि पंधरा दिवस दुकान बंद राहणार.तिसऱ्यांदा पंचवीस हजार दंड आणि एक महिना दुकान सील करणार. तर त्यानंतर प्रत्येकवेळी दंडाची रक्कम वाढवत दुकान महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती शिर्डी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सतिश दिघे यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला
विशेष म्हणजे नगर परिषदेकडून मंदिर परिसरात अधिकृत दरपत्रक लावण्यात आलेलं आहे. फुलभांडार दुकानांमध्येही हे दरपत्रक लावणं बंधनकारक असताना अनेक दुकानांमध्ये नियमांचा सर्रास भंग होत असल्याचं दिसून येतंय. ज्या दुकानांमध्ये भाविकांची लूट सुरू आहे,तेथे दरपत्रकच गायब असल्याचं चित्र समोर आलंय.
इतकंच नाही तर मंदिर परिसरात सक्रिय असलेले काही एजंट भाविकांना काही आमिषं दाखवतात. “दोन मिनिटांत दर्शन”,“व्हीआयपी प्रवेश”,“पार्किंगची व्यवस्था करून देतो",असं ते भाविकांना सांगतात. दरम्यान, काही एजंट भाविकांना थेट दुकानांमध्ये नेत असल्याचंही उघड झालंय.श्रद्धाळू भाविकांना मानसिक दबाव टाकून महागड्या हार-फुलं आणि प्रसाद खरेदी करण्यास भाग पाडलं जातं.
नक्की वाचा >> Devendra Fadnavis : पुण्यात होणार 400 कोटींची गुंतवणूक, CM फडणवीसांनी सांगितला सरकारचा मोठा प्लॅन
साईबाबांच्या नावावर श्रद्धेचा व्यवसाय करून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर आता केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी ठरणार नाही,तर भाविकांची फसवणूक करणाऱ्या दुकान मालकांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत प्रशासन असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.