स्वानंद पाटील, प्रतिनिधी
अभ्यास करणारा कधी कारणं देत नाही, ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याला कुठल्याच गोष्टींचा अडथळा वाटत नाही. देशाला नवी दिशा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रस्त्यावरील दिव्यांच्या खाली बसून अभ्यास केल्याचं अनेक पुस्तकातून आपण वाचतो. अनेक क्रांतिकारकांनी तर तुरुंगातील प्रतिकूल परिस्थितीत पुस्तकं लिहिली. यावरून एवढच लक्षात येतं की, माशाचा डोळा तुमचं लक्ष्य असेल तर आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टींचा परिणाम होऊ शकत नाही.
याचाच दाखला परळी वैद्यनाथ मंदिराबाहेर बसून अभ्यास करणाऱ्या एका चिमुकल्याने दिला आहे. चार बाय चार इतक्या रस्त्यावरच्या जागेवर आपल्या वडिलांना व्यवसायात मदत व्हावी, याबरोबरच अभ्यासही करावा, असं परळीच्या दिपक मुंडें याला वाटतं. इच्छा तिथे मार्ग असला की कोणीही काहीही करू शकतो याचे एक उदाहरण समोर आले आहे. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत यासाठी त्यांना कित्येक वेळा वेगळी खोली, अभ्यासाचा टेबल अभ्यासासाठी वेगळी खुर्ची इतके देऊनही काहीजण अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करतात.
नक्की वाचा - बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?
चिकाटी अन जिद्द असली की काहीही शक्य आहे असेच एक उदाहरण बीडच्या परळी वैजनाथ येथे पाहायला मिळालंय. सकाळी 8 ते दुपारी 1 शाळा करायची आणि शाळा संपली की दुपारी आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायची इतकच नाही तर या व्यवसायात मदत करताना शाळेतील दिलेला गृहपाठ ही पूर्ण करायचा. परळी वैजनाथ येथील दिपक मुंडे नाव असलेल्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने सर्व सुविधा असताना देखील अभ्यास न करणाऱ्या पाल्यांना एक आदर्श उदाहरण दिलं आहे.
दिपकचे वडील वैद्यनाथ मंदिरासमोर बेलफुल विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायात दिपक त्यांना मदत करतो. विशेष म्हणजे मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. असे असतानाही या ठिकाणी अभ्यास करताना त्याचं लक्ष किंचितही विचलित होत नाही. त्याचा अभ्यास सुरुच असतो. अभ्यास झाल्यानंतर तो खेळायलाही जातो. पण परिस्थितीशी न घाबरता लढतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world