विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमणमुक्ती मोहीम हाती घेतली आहे. सर्व शिवप्रेमींनी आज (रविवार, 14 जुलै) विशाळगडावर पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर पोहोचण्याआधीच विशाळगडावर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावर अतिक्रमणमुक्ती मोहिमेसाठी रवाना झाले आहेत. मात्र ते विशाळगडावर पोहोचण्याआधीच तिथे दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गडावर दगडफेक कुणी केली याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. तसेच दगडफेकीच्या व्हिडीओबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं देखील कळतंय.
(नक्की वाचा- संभाजीराजे विशाळगडावर जाणार, शिवप्रेमींना घातली साद! कोल्हापूरमध्ये जमावबंदी लागू )
संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी विशाळगडावर दाखल होणार आहेत. प्रशासनाने विशालगडाकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी शिवप्रेमींमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौज फाटा येते तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन कार्यकर्त्यांना विशाळगड पायथ्याजवळ अडवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.
( नक्की वाचा : दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी का सुरु झाली आहे? )
कोल्हापूरमध्ये जमावबंदी
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यापूर्वीचा बंदी आदेश 14 जुलै पर्यंतचा आहे. त्यानंतर आता पुन्हा नव्याने हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. 15 जुलै रोजी सकाळी 6 ते दिनांक 29 जुलै रोजी रात्री 24 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जाहीर केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world