जाहिरात

Nashik News: खळबळजनक! नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय? 4 महिलांनाही पकडलं, मग काय झालं?

Nashik News : नाशिकमधील लेखानगर परिसरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अंबड पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणातील खरं सत्य आता समोर आलं आहे

Nashik News: खळबळजनक! नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय? 4 महिलांनाही पकडलं, मग काय झालं?
Nashik News : सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (प्रतिकात्मक फोटो)
नाशिक:

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News : नाशिकमधील लेखानगर परिसरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अंबड पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणातील खरं सत्य आता समोर आलं आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा सर्व प्रकार केवळ गैरसमज असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काय होते प्रकरण?

होळीचा सण दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. याच सणाच्या काळात नाशिकच्या लेखानगर भागात चार महिला संशयास्पद रित्या फिरत असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं. 

या महिलांकडे लहान मुलं असल्याने, ही मुलं पळवणारी टोळी असावी असा संशय स्थानिकांना आला. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. नागरिकांनी या चारही महिलांना पकडून ठेवलं आणि पोलिसांना याची माहिती दिली.

(नक्की वाचा : Pune News: लेकीसाठी बाप झाला 'सिंघम'! हुल्लडबाजाला पुण्यातील भर कॉलेजमध्येच चोपले, पाहा VIDEO )

पोलिसांनी तातडीने केली कारवाई

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने लेखानगर परिसरात दाखल झालं. पोलिसांनी गर्दीतून त्या चार महिलांना आपल्या ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणलं. प्राथमिक चौकशी दरम्यान या महिलांनी सांगितलं की, त्या मुलं चोरणाऱ्या नसून केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी होळीच्या सणानिमित्त लाकडं विक्री करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत असलेली मुलं ही त्यांची स्वतःचीच असल्याचा दावाही त्यांनी केला.

महिलांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्यांना नाशिक रोड परिसरातील त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी नेलं. तिथे गेल्यानंतर स्थानिक दुकानदार आणि भाजी विक्रेते यांनी या महिलांची ओळख पटवली. या महिला दरवर्षी होळीच्या काळात लाकडं विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सामील नाहीत, असं स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं. या सखोल तपासानंतर पोलिसांनी त्या महिलांची सुटका केली.

( नक्की वाचा : Rajya Sabha Election : वेटरची मुलगी ते संसद भवन! शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार ज्योती वाघमारे कोण आहेत? )

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी सांगितलं की, लेखानगरमध्ये मुलं पळवणारी टोळी आल्याची चर्चा केवळ एक अफवा होती. ताब्यात घेतलेल्या महिला या व्यावसायिक असून त्या केवळ लाकडं विकण्यासाठी आल्या होत्या. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अपुऱ्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. परिसरात काही संशयास्पद आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com