Palghar News: पालघर जिल्ह्यातील मोखाडा या अतिदुर्गम भागात एका उच्चशिक्षित आदिवासी तरुणाने शेतीचा एक असा प्रयोग केला आहे, जो सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. कृषी क्षेत्रातील पीएचडी (PhD) पदवीधारक असलेल्या डॉ. सुमित ढाक यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 'थायलंड व्हाईट जांभळाची' यशस्वी लागवड केली असून, यातून त्यांनी लाखो रुपयांच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा केला आहे.
पालघर जिल्हा हा आतापर्यंत काळ्या जांभळांच्या भौगोलिक मानांकनासाठी (GI Tag) ओळखला जात होता. मात्र, आता मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील डॉ. सुमित ढाक यांनी नवा पॅटर्न यशस्वी करून दाखवला आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात पीएचडी मिळवलेल्या सुमित यांनी नोकरीच्या मागे न लागता मातीची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
प्रयोगाची सुरुवात आणि तंत्रज्ञान
डॉ. सुमित ढाक यांनी जून 2023 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून या जांभळाची 100 रोपे आणून त्यांची 12 फूट अंतरावर लागवड केली. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करत आधुनिक पद्धतीने बाग फुलवण्यात आली. आंतरपीक म्हणून पहिल्या वर्षी खरबूज आणि दुसऱ्या वर्षी कलिंगड घेतल्यामुळे खर्चही भरून निघाला.
प्रशासनाकडूनही अनोख्या प्रयोगाची दखल
अवघ्या तीन वर्षांत झाडांना मोहर येऊन पांढऱ्या जांभळांचे घोस लागले असून प्रति झाड 5 ते 6 किलो उत्पादनाची अपेक्षा आहे. बाजारात सध्या 150 ते 160 रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने या प्रयोगातून चांगला आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. या उपक्रमाची दखल घेत मोखाडा आणि विक्रमगडचे तहसीलदार तसेच कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी भेट देत कौतुक केले.
(नक्की वाचा- Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका)
सफेद जांभळामध्ये किडनी विकार, रक्ताची कमतरता, मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर गुणकारी ठरण्याचे आयुर्वेदिक गुण असल्याने बाजारात त्याची मागणी वाढत आहे. कमी उंचीची झाडे, लवकर फळधारणा आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न या वैशिष्ट्यांमुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
पालघर, नाशिक आणि कोकणातील शेतकऱ्यांनी या नव्या पर्यायाचा विचार करावा, अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी, तसेच आदिवासी बहुजन समाजातील तरुणांनी बागायती शेतीकडे वळावे, असे आवाहन डॉ. ढाक यांनी केले आहे. शिवाय रोपे आणि तांत्रिक मार्गदर्शन देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
'आदिवासी रत्न' पुरस्काराने सन्मानित
एमटेक आणि पीएचडी पदवीधारक असलेल्या डॉ. ढाक यांना राज्यसरकारने 2019 साली ‘आदिवासी रत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले असून, आधुनिक शेतीतून आदिवासी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा त्यांचा ध्यास आहे.