जाहिरात

Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये

Thane Metro 4A : ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे! शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित 'मेट्रो 4A' ची ट्रायल रन घटस्थापनेच्या मुहूर्तावर, सोमवार 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये
Thane Metro : या मेट्रोमुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane Metro 4A : ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे! शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित 'मेट्रो 4A' ची ट्रायल रन घटस्थापनेच्या मुहूर्तावर, सोमवार 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या पहिल्या ऐतिहासिक प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला जाईल. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) 32.3 किमी लांबीच्या वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 कॉरिडॉरचे काम सुरू आहे. यासोबतच, या मार्गाचे गायमुखपर्यंत (मेट्रो 4A) विस्तारीकरण देखील टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. यातील 10.5 किमी लांबीचा 'कॅडबरी जंक्शन ते गायमुख' हा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या जवळ असून, ट्रायल रन आणि सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत तो प्रवाशांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सुटणार

या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना परिवहन मंत्री आणि ठाणे शहरातील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वर्षांपासून ठाण्यासाठी मेट्रोची मागणी लावून धरली होती. पूर्वीच्या सरकारने 'ठाण्यात मेट्रो व्यवहार्य होणार नाही' असे सांगितले होते, तेव्हा आम्ही 'पुणे-मुंबई तुपाशी तर ठाणे का उपाशी?' असा सवाल विचारला होता."

( नक्की वाचा : Mumbai Monorail Services : मुंबईकरांनो, मोनोरेल तात्पुरती बंद; हजारो प्रवाशांना बसणार फटका! वाचा काय आहे कारण? )

सरनाईक पुढे म्हणाले, "2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही मेट्रोची प्रतिकृती भेट देऊन विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. त्यानंतर पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा पाया रचला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावर कळस चढवला. त्यामुळेच आज ठाणेकरांना ही मेट्रो धावताना दिसत आहे." या मेट्रोमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्षणाला आनंद व्यक्त करताना सांगितले की, "वीस वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी आम्हाला निलंबितही व्हावे लागले होते. त्या आंदोलनामुळेच ही मेट्रो मंजूर झाली आणि आज त्याचे फलित म्हणून ट्रायल रन सुरू होत आहे. यामुळे ठाणेकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल."

ठाणे मेट्रोची 10 स्टेशनं कोणती?


ठाणे मेट्रोची 10 स्टेशन देखील निश्चित झाली आहेत. या स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे. ठाणे मेट्रोची 10 स्टेशनांची नावं खालीलप्रमाणे

1) कॅडबरी 
2) माजीवाडा 
3) कपूरबावाडी 
4) मानपाडा 
5) टिकूजी -नी -वाडी 
6) डोंगरी पाडा 
7) विजय गार्डन 
8) कासरवाडावली, 
9) गव्हाणपाडा
10) गायमुख

( नक्की वाचा : Beed News: प्रतीक्षा संपली! 40 रुपयांत बीडहून अहिल्यानगरला रेल्वेने जा; किती स्टेशन असणार? वाचा सर्व माहिती )


कसा आहे ठाणे मेट्रोचा मार्ग?


मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्टेशन असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्क्यांपेक्षा पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते  गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी धावण्याची शक्यता आहे. तर ठाणेकरांना वडाळापर्यंत मेट्रोनं जाण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com