
केंद्र आणि राज्य सरकारमधील भरतीसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने मुंबई विद्यापीठासोबत करार केला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या स्वाक्षऱ्या झाल्या. ठाणे महापालिकेच्या वतीने आयुक्त सौरभ राव यांनी तर, मुंबई विद्यापीठाच्या वतीने रजिस्ट्रार डॉ. प्रसाद कानडे यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी महापालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे, संस्थेचे संचालक महादेव जगताप, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेची चिंतामराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेला हा करार ऐतिहासिक आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध असल्याने अशा प्रकारचा करार करता आला, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. पदवीची तयारी करीत असतानाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रशिक्षण मिळाल्याने विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरे जाऊ शकतील, असा विश्वास कुलगुरू प्रा. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.या करारानुसार, ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडित कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहेत. यूपीएससीसाऱख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल, तेवढे चांगले असते. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल, याची खात्री असल्याचे आय़ुक्त राव यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
करारात नेमके काय?
यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात उपलब्ध झाल्यास, विद्यार्थी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासोबत यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू शकतात. यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रम पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे याकरिता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी चार क्रेडिट मिळणार आहेत. सदर तीन वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यूपीएससी या स्पर्धा परीक्षेबाबत अभ्यासक्रमाची तोंडओळख होणार आहे. स्पर्धा परीक्षचे एकूण स्तर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करण्याची कार्यपध्दती, परीक्षेत यश संपादन करणे करिता आवश्यक सर्व व्यक्तिमत्व कौशल्यांचा विकास करणे, प्रभावी लेखन कौशल्य आणि प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे व इतर आवश्यक बाबीची माहिती, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे.
अखिल भारतीय पातळीवरील भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.), भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.), आणि इतर संलग्न परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने, त्यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेने सन 1987 पासून चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणान्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world