जाहिरात

Thane News : 5 दिवसांपासून ठाण्यात फिरणाऱ्या बिबट्याला घेतलं ताब्यात; तो अशक्त अन् लंगडा झाला म्हणून...

ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भागात गेल्या पाच दिवसांपासून वावरणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलं आहे.

Thane News : 5 दिवसांपासून ठाण्यात फिरणाऱ्या बिबट्याला घेतलं ताब्यात; तो अशक्त अन् लंगडा झाला म्हणून...

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane News : ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भागात गेल्या पाच दिवसांपासून वावरणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलं आहे. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने भूल देणारे इंजेक्शन देऊन बिबट्याला सुरक्षितरित्या पकडले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पकडण्यात आलेला बिबट्या आजारी आणि अशक्त असल्याची माहिती समोर आली असून, आता त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

बिबट्या लंगडा झाला होता, म्हणून...

ठाणे शहरातील इंदिरानगर येथील डोंगरालगतच्या रहिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिकांनी काढलेल्या व्हिडिओंमध्ये बिबट्या दिसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक रहिवासी बबलू दादू शेख यांनी सांगितलं की, बिबट्या लंगडा असून खूप अशक्त अवस्थेत होता. तो परिसरात कुत्र्यांची शिकार करण्यासाठी फिरत होता. “बिबट्या खूप अशक्त आणि लंगडा होता. तो अनेक दिवसांपासून परिसरात फिरत होता. आम्ही याबाबत वनविभागाकडे तक्रारही केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.”

नक्की वाचा - Dombivli News : 'या' वास्तूने अजिंक्य रहाणेला घडवलं; मैदान वाचविण्यासाठी डोंबिवलीकर एकवटले!

बिबट्याला पकडल्यामुळे नागरिकांना दिलासा...

बिबट्याच्या उपस्थितीची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरावर लक्ष ठेवण्यात आले. बिबट्याला पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी पिंजराही लावण्यात आला होता. मात्र अखेर वनविभागाने भूल देणाऱ्या इंजेक्शनच्या मदतीने बिबट्याला पकडण्यात यश मिळवले. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बिबट्या पकडल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, वनविभागाने बिबट्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या बिबट्या पकडण्यात आल्यामुळे इंदिरानगर आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ माहिती देण्याचं आवाहन केलं आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com