रिझवान शेख, ठाणे
Thane News: वाढती वाहतूककोंडी, अरुंद झालेले रस्ते, मेट्रो आणि सर्व्हिस रोडच्या कामांमुळे उडणारी धूळ, तसेच सतत होणारे अपघात या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरायचे ठरवले आहे. घोडबंदर मार्गावरील या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी 'मशाल यात्रा' येत्या शनिवारी काढण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे आणि मीरा-या भाईंदरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या वाहनांचा संथ प्रवास, मेट्रो आणि रस्ते विस्ताराच्या कामांमुळे निर्माण झालेली अडचण आणि खड्डेमय रस्त्यांमुळे रोज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होते आणि दुरुस्तीचा भार महापालिकांवर येतो.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
याच पार्श्वभूमीवर घोडबंदर रस्ता दोन महापालिकांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून मीरा-भाईंदर महापालिकेकडे याची पूर्तता झाली आहे, तर ठाणे महापालिकेत प्रक्रिया सुरु आहे. या समस्यांवर उपाय म्हणून अवजड वाहनांसाठी 'पिवळ्या मार्गिके'चा प्रयोग करण्याचा विचार वाहतूक विभागाकडून सुरू असला तरी नागरिकांच्या दैनंदिन कोंडीची समस्या कायमच आहे.
घोडबंदर मार्गावरील खराब रस्त्यांमुळे आणि सततच्या अपघातांत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही मशाल यात्रा आयोजित करण्यात येत असल्याचे आंदोलक अजय जया यांनी सांगितले. नागरिकांच्या रागाचे, असंतोषाचे आणि निराशेचे प्रतिक म्हणून मशाली घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत," असे ते म्हणाले. ही मशाल यात्रा शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता कासारवडवली सिग्नल ते वाघबिळ सिग्नल अशी काढली जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, एकत्र उभे राहून समस्या मांडाव्या आणि प्रशासनापुढे ठाम आवाज निर्माण करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world