Thane News: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 23-ब मध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार दीपा गावंड यांनी माघार घेत शिवसेनेच्या (शिंदे गट) बंडखोर उमेदवार प्रमिला केणी यांना पाठिंबा जाहीर केल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 23-ब मध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी मागे घेत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रमिला केणी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे महायुती आणि विशेषतः शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
(नक्की वाचा- BMC Election 2026: मुंबईत 453 उमेदवारांची माघार! 'इतके' जण निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या विभागात किती उमेदवार?)
बंडखोरीचे मूळ कारण काय?
प्रमिला केणी या यापूर्वी राष्ट्रवादीतच सक्रिय होत्या, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, यंदा शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून मनाली पाटील यांना उमेदवारी दिली. मनाली पाटील यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला असतानाही त्यांना पुन्हा संधी मिळाल्याने प्रमिला केणी नाराज झाल्या. स्वाभिमानासाठी त्यांनी धनुष्यबाणाला जय महाराष्ट्र करत अपक्ष अर्ज दाखल केला.
प्रमिला केणी यांची जमेची बाजू म्हणजे 2017 च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत त्या संपूर्ण ठाण्यात सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या होत्या. त्यांची ही लोकप्रियता आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची मिळालेली साथ यामुळे प्रभाग 23-ब मधील लढत आता 'मनाली पाटील विरुद्ध प्रमिला केणी' अशी चुरशीची होणार आहे.
(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)
राजकीय प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी म्हटलं की, "प्रभागाच्या विकासासाठी आणि सक्षम नेतृत्वाला साथ देण्यासाठी आम्ही दीपा गावंड यांची उमेदवारी मागे घेऊन प्रमिला केणींना पाठिंबा देत आहोत." तर ऋता जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "हा लढा अन्यायाविरुद्धचा असून प्रमिला केणींना मिळणारा जनपाठिंबा विजयात रूपांतरित होईल."
तर "लोकांचे प्रेम माझ्या पाठीशी आहे. पक्षाने जरी अन्याय केला तरी जनता मला न्याय देईल", अशी प्रतिक्रिया प्रमिला केणी यांनी दिली आहे.