अविनाश पवार, पुणे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्याची घटना घडली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांना माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माळशेज घाटातील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. हायवे पोलिसांनी नागरिकांना या मार्गाने प्रवास न करता प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- MPSC Paper Leak: एमपीएससी पेपर लीकचा आरोप; व्हायरल चॅट्समुळे खळबळ, स्कीनशॉट्स 'NDTV मराठी'च्या हाती)
रस्ता का खचला? NHAI स्पष्टीकरण
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, करंजाळे गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. यामुळे रस्त्याला लागून असलेल्या शेतीतील माती वाहून गेली आणि महामार्गाच्या पायाभूत संरचनेचे मोठे नुकसान झाले.रस्त्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या गॅबियन भिंतीच्या पायाला धोका निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीला डावीकडील मार्गिका बंद केली होती, परंतु धोका वाढल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग
पर्यायी मार्ग 1: आळेफाटा - नारायणगाव - खेड (राजगुरुनगर) - चाकण - तळेगाव (एमआयडीसी) - लोणावळा - खोपोली - मुंबई.
पर्यायी मार्ग 2: आळेफाटा - संगमनेर - नाशिक - कसारा घाट - कल्याण - मुंबई.