KDMC News : 11 वर्षाच्या मुलाला भेटायला मैत्रिण घरी आली, आई-वडिलांनी पाहिलं पुढं धक्कादायक घडलं

Advertisement
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याण आणि डाेंबिवलीत दोन आत्महत्यांनी एकच खळबळ उडाली आहे. एका 19 वर्षीय तरुणीला आईने मोबाईल वापरण्यास नकार दिल्यानं तिनं आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं. तर कल्याणमध्ये एका 11 वर्षीय मुलाला भेटण्याकरीता त्याची अल्पवयीन मैत्रीण घरात आली.  त्या मैत्रीणीला तिच्या घरी सोडण्यासाठी मुलाचे आई वडिल गेले तेव्हा घरात गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या हेमांगी झोरे या त्यांची मुलगी आणि मुलासोबत राहतात. शुक्रवारी रात्री त्याची मुलगी सजना हेमांगी झोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा माहिती समोर आली की, सजनाही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्या आईला असा संशय होता की, सजना ही काही मुलांसोबत चॅटिंग करते. यामुळे आईने तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला.

यापूर्वीही सजनाच्या आईनं तिच्यासोबत असा प्रकार केला हाेता. त्यावेळी आपण आत्महत्या करणार अशी धमकी सजना देत असे. शुक्रवारी तिच्या आईने पुन्हा तिचा मोबाईल हिसकावून घेतला. रागाच्या भरात सजना हिने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिस करीत आहेत. 

( नक्की वाचा : 'आईवरची शिवी डोक्यात गेली,' ठाण्यातील तरुणानं क्राईम सीरिज पाहिली आणि.... )
 

तर, दुसरीकडे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला भेटण्यासाठी त्याची 13 वर्षांची मैत्रिण घरी आली होती. त्या मुलीला घरात पाहून मुलाच्या आईवडिलांनी तिची चौकशी केली. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन ते तिच्या टिटवाळ्यातील घरी गेले. टिटवाळ्यातून आई-वडील घरी आल्यावर मुलानं आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं. मुलानं नक्की कोणत्या कारणामुळे जीव दिला त्याचा पोलीस तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article