उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता ढेकूण असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
माझ्या नादाला लागू नका, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मी कोणत्या ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं ही अंगठ्याने चिरडायची असतात. एकतर मी राहीन किंवा तू राहशील असं मी म्हटलं तर कुणाला तरी वाटलं मला बोलले. मग ते बोलले माझ्या नादाला लागू नका. पण ते नादाला लागण्याच्या कुवतीचे नाहीत. मी म्हणजे संस्कारी आहे. महाराष्ट्र ओरबडायला मी आलेलो नाही.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पुण्यात येऊन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. उद्धव ठाकरे 'औरंगजेब फॅन क्लब'चे प्रमुख असा उल्लेख अमित शाह यांनी केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांची तुलना अहमद शाह अब्दालीशी केली. अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. नवाज शरीफचा केक खाणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. विश्वासघात करतो तो हिंदू नाही, असं शंकराचार्य यांनी म्हटलं होते.तुम्ही आमचा विश्वासघात केला, तुम्ही कसले हिंदू? मुस्लीम लीगशी बंगालमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे तुम्ही. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
(नक्की वाचा- 'ठाकरे 288 जागा लढले तर 160 जागा जिंकतील' राऊतांचे सुचक वक्तव्य)
देशात सत्ता जिहाद
राज्यात देशात हिंदू-मुस्लीमच्या नावाखाली जे सुरु आहे ते सत्ता जिहाद आहे.सत्तेसाठी वाटेत ते, तोडा फोडा आणि राज्य करा असं सगळं सध्या सुरु आहे. जाती पातीत, धर्मांमध्ये भांडणं लावायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची. हे हिंदुत्व आम्ही मानत नाही. तुमचं हिंदुत्व काय हे अमित शाहांना आम्हाला सांगावं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
भाजप सरकारच्या विकासाच्या मॉडेलवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, भाजप नेते काँग्रेसवर टीका करतात की तुम्ही 70 वर्षात काय केले? काँग्रेस काय केलं यापेक्षा तुम्ही काय केलं हे सांगा. मोदी सरकारने बांधलेलं संसद भवन वर्षभराच्या आत गळायला लागलं. राम मंदिर गळतंय, संसद गळतंय, हे गळती लागलेलं सरकार आहे. याला गळती सरकार म्हणायचं की नाही? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
(नक्की वाचा - विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?)
पुण्यात सुरु असलेला विकास नाही विकार
पुण्यातील पुरामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले, देशात बऱ्याच ठिकाणी पूर येतोय. पुण्यात बेसुमार मेट्रोची कामे सुरु आहेत. मला पुणे वाचवायचंय, म्हणून मला जिंकायचं. मी मुख्यमंत्री असताना पुण्याच्या विकासकामात लक्ष दिलं नाही. कारण इथे पुण्याचे सुभेदार बसले होते.पुण्यात सुरु असलेला विकास नाही विकार आहे. भाजपने हा विकार सुरु केला आहे. कॉन्ट्रॅक्टर्सचे खिसे भरण्यासाठी हे सगळं सुरु आहे. तीन महिने थांबा कॉन्ट्रॅक्टरचा हिशेब करणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.