भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. पुण्यातील भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमने मराठा आरक्षण देण्यासाठी उत्कृष्ट काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक रात्री जागून मराठा समाजाला टीकणारं आरक्षण देण्यासाठी काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी 20 रात्री जागून मराठा आरक्षणासाठी कायदा तयार केला.
(नक्की वाचा- मुख्यमंत्री कोण? ना शिंदे, ना पवार, फडणवीसांनी कोणाचं नाव घेतलं?)
आम्ही देवेंद्रजींना सांगायचो पहाटे 4 पर्यंत जागता, तब्येतीची जरा काळजी घ्या. पण रात्रंदिवस जागून त्यांनी काम केले. मराठा आरक्षणाचा कायदा विधीमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला. मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरेंचं सरकार असताना मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात नीट मांडली गेली नाही, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
(नक्की वाचा - 'शरद पवार देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार' शहांचा हल्लाबोल)
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने चार चांगले वकील नेमले असते तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी निकाली लागला असता. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना व्हिलन करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी अनेक योजना बंद केल्या
राज्यात जनादेशाचा अनादर करुन 2019 साली महाविकास आघाडी सरकार आलं. मात्र आपलं सरकार न आल्याचं दुःख नव्हतं पण दुःख या गोष्टीचं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मोदी सरकारच्या व देवेंद्रजींच्या काळातल्या लोककल्याणकारी योजना बंद पाडण्याचे काम केले. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार योजना जवळपास 18 योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष महाराष्ट्राचे वाया घालवले, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीला मिळणारं एक एक मत हे, मोदी सरकारच्या व महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना थांबवणारं मत आहे. महाविकास आघाडीला तुमच्या वार्डातून, बूथमधून मत गेलं तर हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे. महाराष्ट्रा मागे खेचणारं हे मत असेल. महाविकास आघाडीचं सरकार येणार तर नाही मात्र चुकून आल तर मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या योजना बंद पाडतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.